
सामना प्रतिनिधी । मुंबई
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व मुंबई काँग्रेसचे माजी सरचिटणीस व प्रवक्ते डॉ. अजित सावंत (60) यांचे आज प्रदीर्घ आजाराने राहत्या घरी निधन झाले. उद्या, 8 मार्चला सकाळी 10 वाजता माहीम येथील निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघेल.
अजित सावंत मागील एक वर्षापासून कर्करोगाने आजारी होते. आज सायंकाळी अखेर त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. अजित सावंत यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती तसेच नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय होते. राजकारणाच्या जोडीने त्यांनी कॉलसेंटरच्या युनियनचेही काम पाहिले. अलीकडच्या काळात ते राजकीय विश्लेषक म्हणून टीव्ही चॅनेलच्या चर्चासत्रात भाग घेत असत. राजकीय विषयावर विविध वर्तमानपत्रांत त्यांचे लेखही प्रसिद्ध होत होते. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क होता.
























































