लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा धक्कादायक पराभव झाला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात झालेल्या या दारुण पराभवाची पक्षश्रेष्ठाRकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. दिल्लीत भाजपची पक्षांतर्गत राजकीय खलबते सुरू झाली आहेत. राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली. यानंतर पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फडणवीस यांना तातडीने दिल्लीत भेटण्यासाठी बोलावले आहे. त्यांच्या आधी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी शहा यांची भेट घेतल्याने देवाभाऊ राहणार की जाणार याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या महायुतीने 45 हून अधिक जागा जिंकण्याचा नारा दिला होता, पण प्रत्यक्ष निवडणूक निकालात त्यांना 17 जागांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीला सर्वाधिक 30 जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा मोठा परिणाम चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल केले जाण्याची शक्यता आहे.
पडझड रोखण्यासाठी विचारमंथन
लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेल्या मतांचा विचार करता आगामी निवडणुकांसाठी महायुतीला फारसे समाधानकारक चित्र दिसत नाही. लोकसभेच्या तोंडावर भाजपमध्ये आलेले तसेच काठावर असलेले भाजपचे काही आमदार फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा निवडणुकीदरम्यान होणारी संभाव्य पडझड रोखण्यासाठी भाजपने पक्ष पातळीवर विचारमंथन सुरू केले आहे.