
आपल्या हॉट अंदाजाबद्दल प्रसिद्ध असलेल्या मॉडेल पूनम पांडेने आपल्याच पती विरोधात विनयभंगाचा आरोप केला आहे. तसेच आपल्या पतीने मारहाण केल्याचेही पूनमने म्हटले आहे. पूनम पांडेने दक्षिण गोव्यातील काणकोण पोलीस स्थानकात विनयभंग आणि मारहाणीची तक्रार नोंदवल्या नंतर पोलिसांनी पूनमचा पती सॅम बॉम्बेला अटक केली आहे.
पूनम आपल्या एका चित्रीकरणासाठी दक्षिण गोव्यातील काणकोण येथे आली आहे. तिच्या सोबत तिचा पती सॅम बॉम्बे देखील आला होता. पूनमने आज काणकोण पोलीस स्थानकात तक्रार नोंदवताना पती सॅमने आपला विनयभंग केला असून आपणास मारहाण केल्याचा उल्लेख केला आहे. तक्रार दाखल झाल्या नंतर काणकोण पोलिसांनी पूनमची वैद्यकीय चाचणी करून पती सॅमला अटक केली आहे.
पूनम आणि सॅमचे याच महिन्यात लग्न झाले आहे. कोविडमुळे त्यांनी लग्न साधेपणाने केले होते. इंस्टाग्रामवर तिने 4 दिवसांपूर्वी हॅविंग द बेस्ट हनीमून म्हणत एक व्हिडिओही पोस्ट केला होता.




























































