स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, रणदीप हुड्डा साकारणार सावरकरांची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थोर स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांची 28 मे रोजी 139वी जयंती. या दिनाचे औचित्य साधून आगामी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि सावरकरांची दमदार व्यक्तिरेखा साकारणाऱया रणदीप हुड्डाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला. चित्रपटाच्या पोस्टरवर ‘हिंदुत्व धर्म नहीं, इतिहास है’ असे लिहिले आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या शूटिंगला येत्या ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर आहेत. सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना मांजेरकर यांनी म्हटलंय, लोकांच्या मनात सावरकरांबद्दल वेगवेगळे विचार असू शकतात, पण एक चित्रपट निर्माता म्हणून मी सावरकरांच्या विचारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सावरकर वास्तविक जीवनात जसे होते तसेच चित्रपटातील व्यक्तिरेखेत दिसतील. त्यामध्ये काही फरक पडणार नाही. ते थोर स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना कधीही विसरता येणार नाही.

आपल्या भावना व्यक्त करताना अभिनेता रणदीप हुड्डा म्हणाला, देशाच्या स्वातंत्र्यलढय़ातील सर्वात उंच नायकांपैकी एकाला हा सलाम आहे. मला आशा आहे की, मी एका क्रांतिकारकाची भूमिका पेलू शकेन आणि इतक्या दिवसांपासून दडून राहिलेली त्यांची खरी कहाणी जनतेला सांगू शकेन.
आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि लिजेंड स्टुडिओज प्रस्तुत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित, संदीप सिंग आणि सॅम खान असून सहनिर्मिती रूपा पंडित आणि जफर मेहदी यांची आहे.