
सामना प्रतिनिधी, निफाड
शेतीपूरक व्यवसाय म्हणून तालुक्यात अनेकांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. मात्र तालुक्यात उद्भवलेल्या तीव्र दुष्काळाची झळ या व्यवसायालाही बसली आहे. पावसाचा पत्ता नाही, विहिरींनी तळ गाठला आहे. अशात कुक्कुटपालन व्यवसाय जगवणे शेतकऱ्यांना अवघड जात आहे. तालुक्यात सुमारे 405 शेड आहेत. त्यातील शंभरहून अधिक शेड बंद झाले आहेत तर उर्वरित बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
तालुक्यात तीव्र दुष्काळामुळे कुक्कुटपालन व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय बंद केला आहे. महाराष्ट्रात कुक्कुटपालनाचा व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय आहे. हा व्यवसाय स्वतः भांडवल गुंतवणूक करून करू शकतो, पण जसे शेती मालाचा मोबदला कमी मिळतो त्याच प्रमाणे कुक्कुटपालन व्यवसायात चिकनचा भाव हा फिक्स नाही. त्यामुळे नुकसान जास्त प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रात लिमिटेड कंपन्या आहेत जसे सगुणा, प्रीमियम, शिपी गोजरेज, व्यंकटेश या कंपन्या शेतकऱ्यांबरोबर करार करून योग्य असा मोबदला देतात. म्हणून महाराष्ट्रातील कुक्कुटपालनाचे 80 टक्के शेड हे करारावर चालतात. पण या वर्षी एकदाही पाऊस जोरात न झाल्याने कुक्कुटपालनाचे बरेच शेड बंद करण्यात आले आहेत.
चांदवड, मनमाड, येवला या तालुक्यातील कुक्कुटपालन शेड मागील उन्हाळय़ापासून बंद आहेत. निफाड तालुक्यात 405 शेड आहेत. यापैकी अनेक गावांतील कुक्कुटपालनाचे शेड रिकामे दिसून येत आहेत, दुष्काळाने यंदा उच्चांक गाठला आहे. शेतातील पीक करपून जात आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. जनावरांना चारा नाही. तसेच जोड असलेला हा कुक्कुटपालन व्यवसाय पाण्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अत्यल्प पावसामुळे यंदा विहिरींना, बोअरला पण पाणी नाही. नदी, नाले, विहिरी कोरडय़ाठाक झाल्या आहेत. शेतीला पाणी नाही, पाण्याअभावी पोल्ट्री व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे आर्थिक व्यवस्था बिघडली आहे, असे मुखेडचे कुक्कुटपालन व्यावसायिक कैलास थोरात यांनी सांगितले.
बँकेचे कर्ज काढून पंधरा हजार पक्ष्यांचे शेड उभे केले. मात्र पाण्याअभावी शेड बंद पडल्यात जमा आहे. कर्ज कसे फेडायचे यांचे संकट उभे आहे.
-सुरेशदादा महाले, भरवस
या गावांना फटका…
तालुक्यातील भरवस, रूई, देवगाव, वाकद, शिरवाडे, मुखेड, मानोरी, निमगाव, वाकडा, वाळेगाव, गोंदेगाव, डोंगरगाव, उगाव-शिवडी आदी गावांतील जवळपास शंभरहून अधिक शेड बंद झाले आहेत.
summary- poultry farms getting close due to drought






























































