वीज कंपन्यांनी प्रत्येक महिन्याला बत्ती गुलची माहिती संकेतस्थळावर टाकावी! ऊर्जा विभागाचे निर्देश

आपल्या विभागातील वीज पुरवठा किती वेळा खंडित झाला, किती तास वीज नव्हती याची सर्वसामान्य ग्राहकांना माहिती मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच वीज वितरण कंपन्यांनी तांत्रिक कारणाने वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनांची माहिती प्रत्येक महिन्याला आपल्या संकेतस्थळावर टाकावी असे निर्देश ऊर्जा विभागाने दिले आहेत.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईचा वीज पुरवठा 12 ऑक्टोबर रोजी खंडित झाल्याने नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले होते. त्याची सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे. मात्र एरवी अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो, त्याचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

त्यामुळे भविष्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून उपाययोजना करणे, प्रत्येक महिन्याला वीज पुरवठय़ाचा विश्वासार्हता निर्देशांक चार्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

ऊर्जा विभागाने त्याची दखल घेतली असून यापुढे प्रत्येक महिन्याला वीज पुरवठय़ाबाबतचा विश्वासार्हता निर्देशांक चार्ट प्रसिद्ध करण्याचे निर्देश वीज कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा किती वेळा खंडित झाला त्याची माहिती सामान्यांना समजू शकणार आहे.

संकेतस्थळावर जुनी माहिती

राज्यातील सर्वच वीज कंपन्यांच्या संकेतस्थळावर वीज पुरवठय़ाबाबतचे विश्वासार्हता निर्देशांक चार्ट जुने असल्याचे अनिल गलगली यांनी स्पष्ट केले आहे.

महावितरणच्या संकेतस्थळावरील चार्टनुसार ऑक्टोबर 2019 पर्यंतच्या आकडेवारी नुसार तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या 15 हजार 745 घटना घडल्या असून 20 हजारहून अधिक तास वीज पुरवठा खंडित असल्याचे दिसत आहे.

टाटा पॉवरच्या संकेतस्थळावर मार्च 2020 पर्यंतचा चार्ट असून अदानी इलेक्ट्रिसिटीच्या संकेतस्थळावर मार्च 2019 पर्यंतचा चार्ट आहे.

आपली प्रतिक्रिया द्या