अफगाणिस्तानमध्ये ६.२ तीव्रतेचा भूकंप, दिल्ली-एनसीआरसह हिंदुस्थानात अनेक भागात जाणवले हादरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तानमधील हिंदूकुश पर्वत रांगांमध्ये शनिवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाचे जोरदार धक्के हिंदुस्थानात दिल्ली आणि एनसीआर परिसरासह उत्तर भारताच्या अनेक भागांत जाणवले. सुदैवाने या नैसर्गिक आपत्तीत हिंदुस्थानात किंवा इतरत्र कोणतीही जीवितहानी अथवा मोठी वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू ईशान्य अफगाणिस्तानातील कालाफगान शहरापासून सुमारे ८१ किलोमीटर दूर, जमिनीखाली तब्बल २१५ किलोमीटर खोल होता. केंद्रबिंदू खूप खोल असल्यामुळे या भूकंपाचे झटके केवळ अफगाणिस्तानपुरते मर्यादित न राहता हिंदुस्थान, पाकिस्तान, चीन, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या शेजारील देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर जाणवले.

हिंदुस्थानात विशेषतः दिल्ली-एनसीआरमध्ये काही सेकंदांसाठी हे धक्के जाणवले. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाची तीव्रता अधिक जाणवल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट उडाली. सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक नागरिक आपली घरे आणि कार्यालयांमधून बाहेर पडून रस्त्यांवर तसेच मोकळ्या जागांवर जमा झाले होते.