
शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले निष्ठावंत शिवसैनिक, नायगावमधील माजी शाखाप्रमुख प्रभाकर भूमकर यांचे शनिवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कुसुम, मुलगा सुनील, सून चंद्रविजया आणि तीन नातू यांचा समावेश आहे. रविवारी सकाळी नायगाव-भोईवाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहत त्यांना आदरांजली वाहिली.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि लढवय्या शिवसैनिक म्हणून प्रभाकर भूमकर यांची ख्याती होती. दिव्यांग असूनसुद्धा सर्व निवडणुकांमध्ये स्वतःची रिक्षा घेऊन त्यावर लाऊडस्पीकर आणि भोंगा लावून शिवसेनेच्या प्रचाराचे काम भूमकरांनी केले होते. बेळगाव सीमालढय़ासारख्या शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी हिरिरीने भाग घेतला होता. पक्षासाठी अनेकवेळा त्यांनी तुरुंगवासदेखील भोगला होता.






























































