‘एमआयएम’लोकशाही मानणारा, आघाडी करू; प्रकाश आंबेडकरांचे सूतोवाच

76

सामना प्रतिनिधी, संभाजीनगर

मजलीस ए इत्तेहादूल मुसलमीन अर्थात एमआयएम हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्यासोबत आघाडी करण्यास तयार असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी आणि बहुजन समाज पार्टीचे दिवंगत नेते कांशीराम यांच्या राजकारणाचा पोत सारखाच असल्याचेही ते म्हणाले.

आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील विविध समाज घटकांशी संबंधित संघटनांची एकत्र मोट बांधून वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. या आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आलेल्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत आतापर्यंत सत्तेच्या लाभापासून दूर राहिलेल्या वंचितांना संधी देण्यासाठीच ही आघाडी स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आघाडीच्या वतीने आम्ही काँग्रेससमोर एकत्रित लढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आता निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसने प्रस्ताव नाकारला तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार का, असे विचारले असता त्यांनी अटीशर्तींवर चर्चा होऊ शकते, असे सूचक उत्तर दिले. कर्नाटकचा धडा घेऊन काँग्रेस आमचा प्रस्ताव नाकारणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढण्याचा आमचा विचार आहे. जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊ, असेही ते म्हणाले.

संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध
पंढरपूरकडे निघालेल्या पालखी सोहळ्यात संभाजी भिडे यांनी जे वक्तव्य केले ते अत्यंत निषेधार्ह आहे. आंबेडकरवाद्यांनी त्याचा निषेध करून फारसा फरक पडणार नाही, ओबीसी समाजाने त्याचा निषेध केला तर मोठा फरक पडेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. संभाजी भिडे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वेषाचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या पत्रकार परिषदेस लक्ष्मण माने, विजय मोरे, प्रा. अविनाश डोळस, रामभाऊ पेरकर, पंडित तुपे, अमित भुईगळ यांची उपस्थिती होती.

प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
वंचित बहुजन आघाडी बेरजेचे राजकारण करणार आहे. जे आमच्या सोबत येतील त्यांच्या साथीने आगामी निवडणुका आम्ही लढणार आहोत, असे सांगत असतानाच लक्ष्मण माने यांनी आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ऍड. प्रकाश आंबेडकर असतील, अशी घोषणा केली.

आपली प्रतिक्रिया द्या