पशुपालकांच्या देवता

>> प्रणव पाटील

पशुपालकांच्या देवदेवतांचा अभ्यास जागतिक इतिहासकारांमध्ये मानाचं स्थान असणाऱया डॉ. डी. डी. कोसंबी यांनी सर्वात आधी केला होता. पशुपालक संस्कृती व त्यांच्या देवदेवतांवर अभ्यास होणे गरजेचे आहे ही त्यांची इच्छा जर्मन संशोधक गुंथर सोंथायमर यांनी पूर्ण केली. धनगरी देवांच्या संशोधनासाठी महाराष्ट्राबरोबर दक्षिण हिंदुस्थान आपल्या पायदळी तुडवत त्यांनी संपूर्ण दक्षिण हिंदुस्थानीय पशुपालकांच्या दैवतांचा अभ्यास करून ‘‘Pastrolist Deities in Western India’’ हा संशोधनपर ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर करणाऱया गुंथर यांच्या सहकारी श्रीमती ऍन फेल्डहाऊस यांनीही गुंथर यांच्यानंतर महाराष्ट्रातील पशुपालकांवर अभ्यास करून त्यांचे मौखिक वाङ्मय संकलित केले. ‘‘मराठी मौखिक वाङ्मय’’ या नावाने मराठीत त्याचे भाषांतरही झाले आहे. पशुपालकांच्या मौखिक वाङ्मयातून त्यांच्या श्रद्धा विश्वातील देवता कोणत्या आहेत हे कळून येते.

महाराष्ट्राच्या देव्हाऱयामध्ये आज गाजती असणारी अनेक दैवते ही गवळी-धनगरांच्या परंपरेतून पुढे येऊन सर्व समाजाच्या पूजेस पात्र ठरली आहेत. आज महाराष्ट्रातील लोकदैवतांवर इतक्या वर्षांपासून पडलेल्या अनेक देवता-उपासना, पंथांच्या प्रभाव यामुळे अनेक दैवतांचे मूळ हे गोप संस्कृतीमधून आले आहे, हे खरेच वाटत नाही. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणारा खंडोबा त्याच्या अवतारकथेत धनगरकन्या बाणाईच्या प्रेमात पडून 12 वर्षे गुरे राखतो आणि शेवटी बाणाईशी लग्न करून जेजुरीला राहतो. या खंडोबाला आंध्र प्रदेशात मल्लिकार्जुन अथवा मल्लण्णा नावाने पुजले जाते. तेथेही तो पशुपालक गोल्ला किंवा चेंचूसारख्या टोळय़ांचा आवडता देव आहे. आजही धनगरांच्या मौखिक साहित्यात खंडोबा आणि बाणाईची कथा मोठय़ा श्रद्धेने सांगितली जाते. यामुळेच पशुपालक धनगर या खंडोबाला आपला जावईच मानतात. होळकर राजघराण्याच्या उदार लोकाश्रयाला खंडोबावरची त्यांची भक्ती कशी कारणीभूत होती हे तेथील शिलालेखांवरून समजते.

या जेजुरी क्षेत्रापासून जवळच असलेल्या वीरचा म्हस्कोबा या प्रसिद्ध लोकदेवतेची कथाच मुळात दक्षिणेतून चारापाण्याच्या शोधासाठी नीरा नदीकाठी आलेल्या कमळोजी धनगरापासून सुरू होते. त्याच्या म्हशीच्या नखातून आलेला देव म्हणून म्हस्कोबा हा देव ओळखला जातो. आजही वीर येथे होणाऱया आबेद राजाला विविध विधींमध्ये पशुपालकांच्या प्रथांमधील अवशेष शिल्लक आहेत. या वीरच्या मंदिराबाहेर देवाच्या पशुपालक उपासकांच्या स्मृती शिळांबरोबर मध्ययुगीन शैलीतील कमळोजीचीही समाधी आहे. खंडाळय़ाच्या घाटातील शिग्रोबा असो की सोलापूर-पुणे रस्त्यावरचा जावजीबुवा ही मुख्य मार्गावरील मंदिरे पशुपालकांच्या नेहमीच्या स्थलांतरांच्या मार्गावरील त्यांच्या पूर्वजांची मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये त्या त्या पशुपालकांच्या विटांबरोबरच त्यांच्या कुळातील पुढील पिढय़ांची ही स्मृती शिळा असतात.

महाराष्ट्राचे आवडते दैवत असणारा विठोबा हाही धनगरांच्या बिरोबा या दैवताशी जोडला जातो. पट्टणकुडोलीचे विठ्ठल-बिरदेव मंदिर असेच एक उदाहरण आहे. या विठ्ठल-बिरदेवसंबंधाची कथा सांगणाऱया तीन कथा या दुर्गा भागवत यांनी संकलित केलेल्या आहेत. पुढे गुंथर सोंथायमर व रा. चिं. ढेरे यांनी या विठ्ठलाचा शोध घेताना त्याची पशुपालक संस्कृतीशी असणारा संबंधही लक्षात घेऊन संशोधन केले. लिळा चरित्रानुसार तर विठ्ठल हाही एक पशुपालक असून गाईंचे रक्षण करताना त्याला मरण आले. त्यानंतर त्या जागी त्याचे स्मारक उभे केले गेले. विठ्ठलाशी अशाप्रकारे पशुपालन संस्कृतीत नाते सांगितले जाते. खंडोबा, म्हस्कोबाबरोबर बिरोबा, धुळोबा, बाबीरबुवा, विठोबा या पुरुष देवतांबरोबर भिवाई, नागाई, मायक्का देवी, यल्लम्मा या देवीही आहेत. यातील बिरोबा हा महाराष्ट्रातील पशुपालकांमध्ये लोकप्रिय पावलेला देव असून त्याचे मूळ ठिकाण हे सांगली जिह्यात आरेवाडी हे ठिकाण दाखवले जाते. धनगरी ओव्यांमध्ये या बिरोबाची भक्ती भरून पावलेली आहे. या बिरोबाची कथा धनगर ढोलाच्या गजरात म्हणताना आजही दिसतात. त्यातील गंगा-सुरवंतीची ओवी प्रसिद्ध आहे –
सुंबरानु मांडलं व । सुंबरानु मांडलं
भोळय़ा माझ्या देवाचं व । मायवाच्या बंधुचं
मायवाच्या बंधुचं व । सुरवंतीच्या बाळाचं ।।
अशा प्रकारच्या ओवी रात्रभर बिरोबाचे भक्त गात असतात.

दुसरा एक प्रसिद्ध देव म्हणजे रामोशांकडून गुरे राखताना मारला गेलेला बाबीर हा वीर. महाराष्ट्रात गुरांचे रक्षण करताना मरण पावलेल्या वीरांचे स्मारक वीरगळांच्या रूपाने जतन केले जाते. तशाच प्रकारे बाबीरसारखा वीराचे उन्नयन होऊन देवता रूपात पुजले जाण्याची प्रथा पशुपालकांच्या संस्कृतीत पाहायला मिळते. पशुपालक आजही त्यांच्याबरोबर स्थलांतर करताना आपले इष्टदेव व त्यांचा देव्हारा घेऊन प्रवास करतात. त्यात धुळोबा, बिरोबा, सिदोबा इ. देवतांचे टाक असतात. पशुपालकांच्या देवतांचे आगमन हे त्या समाजाच्या आगमनाची कथा सांगणारा सामाजिक इतिहास असतो असे गुंथर म्हणतो.

शिखर शिंगणापूरपासून ते खंडोबा, विठोबापर्यंतचे प्रसिद्ध लोकदेव हे पशुपालकांच्या संस्कृतीतूनच उन्नयन पावल्याचे अनेक संशोधक मान्य करतात. या देवतांमुळेच महाराष्ट्रात मौखिक साहित्याची मोठय़ा प्रमाणावर रचना झाली व लोकसंस्कृती समृद्ध होण्यासाठी त्याचा प्रमुख हातभार लागला.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या