जागतिक कॅरम स्पर्धा प्रशांत, अपूर्वा वर्ल्ड चॅम्पियन

सामना ऑनलाईन । मुंबई 

हिंदुस्थानच्या कॅरमपटूंनी दक्षिण कोरियात झालेल्या वर्ल्ड कप या जागतिक अन् प्रतिष्ठेच्या कॅरम स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत देशाचा झेंडा रुबाबात फडकवला. मराठमोळय़ा प्रशांत मोरेने पुरुषांच्या एकेरीत, तर एस. अपूर्वाने महिला एकेरीत जेतेपदावर नाव कोरले. यापूर्वी 2016 मध्ये यू. के. येथे झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेमध्येही प्रशांत व अपूर्वाने हिंदुस्थानला एकेरी गटात सुवर्णपदक मिळवून दिले होते. स्वीस लीगमध्ये काजल कुमारीने बाजी मारली. हिंदुस्थानने या स्पर्धेत एकूण 12 पदकांची कमाई केली.

हिंदुस्थानचे घवघवीत यश
हिंदुस्थानने या स्पर्धेत 5 सुवर्णपदके, 5 रौप्यपदके व 2 कास्यपदकांची कमाई केली. यजमान कोरियाव्यतिरिक्त हिंदुस्थान, श्रीलंका, अमेरिका, मालदीवज्, कतार, जपान, पाकिस्तान, पोलंड, झेक रिपब्लिक, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, मलेशिया, सर्बिया, यू. के. अशा एकंदर 17 देशांनी या विश्व कप स्पर्धेमध्ये आपला सहभाग घेतला होता.