भूषण यांच्या शिक्षेवरून `सर्वोच्च’ पेच; खुशाल शिक्षा द्या, पण माफी मागणार नाही! प्रशांत भूषण ठाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यायसंस्था आणि सरन्यायाधीश यांच्याविरुद्ध केलेल्या दोन ट्विटप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांना दोषी ठरविले; पण शिक्षा सुनावताना ‘सर्वोच्च’ पेच उभा राहिल्याचे आज पहायला मिळाले. खुशाल शिक्षा द्या, पण माफी मागणार नाही, या भूमिकेवर भूषण अजूनही ठाम आहेत. दरम्यान, आत 2009च्या भूषण यांच्या विरुद्धच्या अवमान याचिकेवरील सुनावणी आता 10 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

22 जून रोजी सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरच्या रविभवन येथे हेर्ले डेव्हिडसन या बाईकवर स्वार झाल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावर प्रशांत भूषण यांनी ट्विट केले होते. तसेच 2009मध्ये न्यायसंस्थेतील भ्रष्टाचारावर त्यांनी ट्विट केले होते. या दोन प्रकरणात भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठाने भूषण यांना 14 ऑगस्टला दोषी ठरविले. 20 ऑगस्टला शिक्षेबाबत सुनावणी झाली, पण भूषण यांना पुनर्विचार करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी दिला गेला. आपण न्यायालयाचा अवमान केलेला नाही. त्यामुळे माफी मागणार नाही. या भूमिकेवर भूषण ठाम राहिले.

मंगळवारी न्यायालयात सुनावणीवेळी ‘सर्वोच्च’ पेच पहायला मिळाला. न्यायमूर्ती मिश्रा, प्रशांत भूषण यांचे वकील राजीव धवन आणि केंद्र सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी भूमिका मांडली.

भूषण यांनी दिलेला प्रतिसाद वेदनादायी – न्या. मिश्रा

प्रशांत भूषण हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत. त्यांनी माफी मागण्यास नकार दिलेला आहे. आपण काही चुकीचे केले असे त्यांना वाटत नाही. लोक चुका करतात, पण भूषण यांना चूक केल्याचे वाटत नाही. मग अशावेळी आम्ही (न्यायालय) काय करावे? असा सवाल करताना भूषण यांनी माफीनामा संदर्भात दिलेला प्रतिसाद जास्त मानहानीकारक आणि वेदनादायी आहे, असे न्यायमूर्ती अरुण मिश्रा म्हणाले. 30 वर्षांपासून भूषण येथे न्यायालयात उभे असतात. दुसरे कोणी असते तर आम्ही दुर्लक्ष केले असते. भूषण या संस्थेचा भाग आहेत. त्यामुळे त्यांनाही न्यायव्यवस्थेवर विश्वास हवा. आपण काही चुकीचे केले असे त्यांना वाटतच नसेल, तर केवळ समज देवून काय होणार? असा सवालही न्या. मिश्रा यांनी केला.

शिक्षा नको; केवळ समज देऊन भूषण यांना सोडा – वेणुगोपाल

सर्वोच्च न्यायालयाने अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना मत विचारले. तेव्हा वेणुगोपाल म्हणाले, प्रशांत भूषण यांचे ट्विट न्यायसंस्थेत सुधारणेच्या दृष्टीने केले होते. त्यामुळे भूषण यांना कोणतीही शिक्षा न देता केवळ समज देवून सोडण्यात यावे. दोन सीबीआय अधिकाऱ्यांच्या भांडणात प्रशांत भूषण यांनी माझे नाव घेतले होते. मी त्यावेळी मीदेखील भूषण यांच्यावर अवमानाचा खटला दाखल करणार होतो. पण भूषण यांनी खेद व्यक्त केल्यानंतर मी माघार घेतली होती. याची आठवण वेणुगोपाल यांनी करून दिली. मत व्यक्त करण्याचा अधिकार भूषण यांनी वापरला आहे, असे वेणुगोपाल म्हणाले.