वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या बहुद्देशीय स्मारकासाठी भूखंड द्या! राज्य सरकारकडे प्रतिष्ठानच्या वतीने मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘गाढवाचं लग्न’ या वगनाटय़ाद्वारे देश-विदेशातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे वगसम्राट दादू इंदुरीकर यांचे बहुद्देशीय स्मारक उभारण्यासाठी त्यांच्या इंदुरी या मूळ गावी अथवा मावळ तालुक्यात चार ते सहा एकर भूखंड राज्य सरकारने सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वगसम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठानने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नुकतीच केली आहे.

स्मारकासाठी शासकीय भूखंडासह गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. इंदुरी बायपास रोडवरील दुभाजकाच्या बेटात दादू इंदुरीकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, महाराष्ट्र शासनाने दादू इंदुरीकर यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, अभिनय आणि विनोद या कलागुणांचा संगम असलेल्या उत्कृष्ट लोकलावंताला दरवर्षी दादू इंदुरीकर यांच्या नावे जीवनगौरव पुरस्कार देण्यात यावा आणि या पुरस्काराची रक्कम दहा लाख रुपये असावी, दादू इंदुरीकर यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 13 जूनला इंदुरीकर यांच्या मूळ आवाजातील ‘गाढवाचं लग्न’ वगनाटय़ाचे आकाशवाणी आणि दूरदर्शनवर पुनःप्रक्षेपण करावे आदी मागण्या वगसम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठानने केल्या आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक सरचिटणीस अशोक सरोदे- इंदुरीकर यांनी दिली आहे.