
सामना प्रतिनिधी। न्हावाशेवा
शिवसैनिकांनी सर्व मतभेद विसरून एकत्रपणे काम करू या आणि पुन्हा एकदा मावळ लोकसभेवर भगवा फडकवू या असे आवाहन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उरण येथिल शिवसैनिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या मेळाव्यात केले. उरण तालुक्यातील शिवसैनिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा मेळावा गुरूवार 06 रोजी तेरापंथी सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. बारणे यांनी पुढे बोलताना सांगितले की, माझ्या खासदारकीच्या कालावधीत मी लोकसभेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित केल. त्यामध्ये उरण मतदार संघातील प्रश्न सर्वाधिक होते. माझ्या मागणीमुळेच उरण तालुक्यातील रस्त्यांची कामे, मच्छिमारांचे प्रश्न तसेच घारापुरी विजेचा प्रश्न सुटला असल्याचे सांगितले.
या मेळाव्यात बोलताना रायगड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख दत्ताजी दळवी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिवसैनिकांनी आपआपसातील मतभेद चव्हाट्यावर न मांडता थेट खासदार आणि आमदारांना जाब विचारा, लोकप्रतिनीधिपेक्षा शिवसैनिक हे पद श्रेष्ठ आहे. शिवसेना ही तकलादू नसून लढाऊ आहे त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी संघटना मजबूत करण्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले. तर जिल्हाप्रमुख आमदार मनोहरशेठ भोईर यांनी पक्षाला हानी पोहचविणाऱ्या प्रवृत्तीला वेळीच ठेचले पाहिजे, ज्या पदाधिकाऱ्यांना झेपत नसेल त्यांनी पद सोडा आणि दुसऱ्याला संधी द्या असे सांगितले. संधीसाधू लोकांना त्यांना पक्ष सोडून जाण्यास सांगितले. यावेळी आमदार मनोहर भोईर यांनी उरण तालुक्यात लवकरच 100 खाटांचे रूग्णालय, क्रीडा संकूल, उरण बायपास रस्ता यासारखी काम मी केलेल्या प्रयत्नांमुळे मार्गी लागणार असल्याचे सांगितले. तसेच शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे तालुक्यात खारबंधिस्तीची कामे करून हजारो हेक्टर शेती वाचविण्याचे काम केले आहे याचा फायदा येत्या निवडणूकीत शिवसेनेला नक्की होईल असे सांगितले.
या मेळाव्यात उरण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास म्हात्रे यांनी लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांना काही सूचना केल्या. या मेळाव्याला खासदार श्रीरंग बारणे, उत्तर रायगडचे संपर्कप्रमुख दत्ताजी दळवी, जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, माजी नगराध्यक्ष व गटनेते गणेश शिंदे, पंचायत समितीचे सदस्य दिपक ठाकूर, हिराजी घरत, माजी सभापती विश्वास म्हात्रे, शहर प्रमुख विनोद म्हात्रे आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.































































