
सामना ऑनलाईन, मुंबई
थर्टी फर्स्टच्या पार्टीची झिंग उतरण्याच्या आधीच भाजप सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हिंदुस्थानी बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतीमध्ये 18 ते 21 टक्के वाढ केली आहे. यामुळे सिग्नेचर, ऍण्टीक्विटी, ब्लेंडर्स प्राइड, रॉयल स्टॅगपासून उंची मद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हॅट 69 चे दर चढणार आहेत. दारूच्या किमती वाढवल्यामुळे राज्याच्या महसुलात 500 कोटी रुपयांची वाढ होणार आहे, मात्र दारूच्या किमती वाढल्यामुळे समस्त तळीरामांची दारू खाडकन उतरली आहे.
राज्यात 31 डिसेंबरच्या ओल्या पाटर्य़ा झाल्यावर आता राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने 1 जानेवारीपासून हिंदुस्थानी बनावटीच्या विदेशी मद्याची (आयएमएफएल म्हणजे इंडियन मेड फॉरिन लिकर) किंमत 18 ते 21 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यम स्वरूपाच्या दारू (मिड सेगमेंट) व उंची दारू (प्रीमियम ब्रॅण्ड)चे दर वाढणार आहेत, मात्र देशी व कंट्री लिकरच्या किमती वाढणार नाहीत. आयएमएफएलचे दर वाढवल्यामुळे राज्याच्या महसुलात दरवर्षाला 500 कोटी रुपयांची वाढ होईल.
स्टॉक संपेपर्यंत पिऊन घ्या
उत्पादन शुल्क विभागाने 1 जानेवारीपासूनच दर वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी दारूचे दर तत्काळ वाढणार नाहीत. कारण वाईन शॉपमधील जुना स्टॉक संपुष्टात येऊन नवीन स्टॉक बाजारात येईपर्यंत दारूच्या किमती वाढणार नाहीत असे मुंबईतील एका प्रख्यात वाईन शॉपच्या मालकाने सांगितले. दारूच्या बॉक्सवर छापील किंमत असते. नवीन दर निश्चित झाल्यावर नव्या किमती बॉक्सवर छापल्या जातील. त्यानंतर नवीन दर लागू होतील. तोपर्यंत नवीन दर लागू करता येणार नाही असे या विक्रेत्याने स्पष्ट केले.
या श्रेणीतील दारू महागणार
रॉयल स्टॅग, सिग्नेचर, ब्लेंडर्स प्राइड, ऍण्टीक्विटी या कॅटेगरीतील दारूच्या किमती 18 ते 20 टक्क्यांनी वाढतील तर व्हॅट 69 अशा उंची श्रेणीतील दारूच्या किमतीत 21 टक्क्यांनी वाढ होईल.
किमती वाढल्या तरी विक्री जोरात
दारूच्या किमती यापूर्वीही वाढल्या तरी विक्रीत घट झालेली नाही. कारण मागील वर्षीच्या तुलनेत दारूच्या विक्रीच्या महसुलात 16.6 टक्के वाढ झाली आहे. 2017 या वर्षात दारूच्या माध्यमातून विक्रीतून 8 हजार 915 कोटी रुपयांचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा झाला होता. तर डिसेंबर 2018 वर्षअखेरपर्यंत 10 हजार 400 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. या वर्षात 13 हजार 343 कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट राज्य उत्पादन विभागाने ठेवले आहे.






























































