
मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणाऱया भाजप नेत्या नूपुर शर्मा यांच्या अटकेची मागणी होऊ लागली आहे. जेव्हा देशातील मुस्लिमांचा प्रश्न येतो तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे ऐकत नाहीत. भाजपने मुस्लिमांचा अपमान केला आहे, असा आरोप करीत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी नूपुर शर्मा यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
नूपुर शर्मा यांना भाजपने निलंबित केले. या कारवाईनंतरही शर्मा यांच्या विधानावर संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ओवेसी यांनी सोमवारी भाजपवर निशाणा साधला.
मोदींचे परराष्ट्र धोरण अपयशी
नूपुर शर्मा यांच्या विधानावर आखाती देशांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांना पक्षातून हाकलण्यात आले. हे पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे. नूपुर शर्मा यांना तातडीने अटक करा. कानपूर हिंसाचारानंतर भाजपने तत्काळ राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा बडगा उगारला; मग मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने करणाऱयांवरकारवाई का केली नाही, असा सवाल ओवेसी यांनी केला.




























































