
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या 2022 च्या हंगामासाठी आज मुंबई रणजी संघाची घोषणा मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए )च्या निवड समितीने केली. विशेष म्हणजे मुंबई संघाचे नेतृत्व युवा धडाकेबाज फलंदाज पृथ्वी शॉ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या संघात मुंबई आणि टीम इंडियाचे नेतृत्व केलेल्या अनुभवी अजिंक्य रहाणेला पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली रणजी लढती खेळाव्या लागणार आहेत.
41 वेळा रणजी करंडक आपले नाव कोरणाऱ्या हेवीवेट मुंबईला यंदा पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी जोरदार संघर्ष करावा लागणार आहे. या संघात माजी कर्णधार सचिन तेंडुलकर याचा मुलगा आणि डावखुरा मध्यमगती गोलंदाज अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर याचाही समावेश करण्यात आला आहे. अंडर-19 स्पर्धा गाजवणारा सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी याला मात्र मुंबईच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. माजी कर्णधार व यष्टिरक्षक आदित्य तरे, वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी यांना स्थान देण्यात आले आहे
मुंबईच्या एलिट गटात सौराष्ट्र, ओडिशा, गोवा
माजी रणजी विजेत्या मुंबईच्या एलिट ‘ड’ गटात सौराष्ट्र, ओडिशा आणि गोवा या संघांचा समावेश आहे. या गटाचे सगळे साखळी सामने अहमदाबाद येथे खेळवले जाणार आहेत. एमसीए निवड समितीचे अध्यक्ष सलील अंकोला, गुलाम परकार, सुनील मोरे, प्रसाद देसाई आणि आनंद याल्विगी यांच्या निवड समितीने मुंबई रणजी संघाची निवड केली आहे.
मुंबई रणजी संघ
पृथ्वी शॉ (कर्णधार), अजिंक्य रहाणे, यशस्वी जैसवाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सर्फराज खान, सचिन यादव, आदित्य तरे (यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), शिवम दुबे, अमन खान, शम्स मुलानी, तनुष कोटियन, प्रशांत सोलंकी, शशांक अत्तरडे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिन्स बदियानी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टन डायस आणि अर्जुन तेंडुलकर.




























































