‘स्टायलिस्ट’ प्रिया पाटील केबीसीमध्ये अमिताभ बच्चन यांना दिला लक्षवेधी लुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती’ चा 15 वा सीझन येत्या 14 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता सुरू होत आहे. या शोचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन लक्षवेधी पोशाखांत प्रेक्षकांसमोर येतात. प्रत्येक सीझनमध्ये त्यांचा लुक आकर्षक बनवण्यामध्ये डिझायनर प्रिया पाटील हिचा मोलाचा वाटा आहे. नव्या सीझनमध्येही प्रिया फॅशन ट्रेंडनुसार अमिताभ बच्चन यांना स्टायलिश पोशाख देणार आहे.

याविषयी प्रिया पाटील म्हणाली, ‘कौन बनेगा करोडपती’च्या 15 व्या सीझनसाठी मला लुक थोडा नवीन आणि फ्रेश ठेवायचा आहे. क्लासिक लुक जसाच्या तसा कायम ठेवून आम्ही काही आणखी नवे बदल घेऊन येणार आहोत. अमिताभ बच्चन उत्कृष्ट थ्री पीस सूट, बंद गळय़ाचे सूट आणि जोधपुरी सूट घातलेले दिसतील, पण मी त्यांना कॉन्ट्रास्ट रंगसंगतीचे कपडे देत आहे जे खुलून दिसतील. उत्कृष्ट जोधपुरीसोबत खास शाल आणि त्याला साजेसा ब्रोच असेल.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी प्रिया म्हणाली, बिग बींकडे पाहून मी खूप काही शिकले आहे. त्यांचे समर्पण, व्यावसायिकता या वृत्तींतून खूप शिकायला मिळते. ते स्वतःच एक स्टाइल आयकॉन आहेत, असे मला वाटते. पोशाख माणसाला घडवत नाही, तर माणूस पोशाख घडवतो. ते जे परिधान करतात तोच ट्रेंड बनतो.