
सामना ऑनलाईन । सिद्धार्थनगर
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला आपण कसा धडा शिकवला याच्याच बाता आपल्या प्रचारसभांमध्ये मारत आहेत. मात्र देशातील लाखो शेतकरी आणि बेरोजगारांच्या समस्यांबाबत ते चकार शब्दही काढत नाहीत, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरच्या प्रचारसभेत बोलताना केली.
प्रियंका म्हणाल्या की, एनडीएच्या राजवटीत मध्य प्रदेश, हरयाणा, पंजाब, महाराष्ट्रातील समस्याग्रस्त शेतकऱयांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी थेट दिल्लीपर्यंत धडक मारली होती. पण पंतप्रधान मोदी यांच्याकडे शेतकऱयांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी वेळच नाही, अशी टीकाही प्रियंका यांनी केली.
उद्योगपतींना कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना शिक्षा
मोदी सरकारच्या काळात देशातील बडय़ा उद्योगपतींना 5 लाख 50 हजार कोटींची कर्जमाफी दिली गेली. मात्र शेतकऱयांची कर्जे माफ करताना या सरकारचा हात आखडता राहिला. पंतप्रधानांच्या उद्योगपती मित्रांना मात्र गेल्या 5 वर्षांत 10 हजार कोटींचा निव्वळ लाभ झालेला आहे, असा आरोपही प्रियंका यांनी यावेळी केला.
भाजप सरकार अहंकारी असून त्यांनी देशात संताप, जाती विद्वेष आणि नकारात्मक भावनेचाच प्रसार अधिक केला आहे.
-प्रियंका गांधी, काँग्रेस सरचिटणीस
























































