
मालवण-देवगड मार्गावरील धोकादायक कोळंब पूल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दुरुस्त करण्यात आला. पुलावरून एसटी बस व अन्य वाहतूक आठ महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, पुलाची दुरुस्ती खरच पूर्ण झाली आहे का, असा सवाल पुलाच्या दोन्ही मार्गावर असलेले मोठमोठे खड्डे व पुलाखालील मातीचे ढिगारे पाहून उपस्थित केला जात आहे.
पुलाखाली अयोग्य पद्धतीने टाकण्यात आलेला दगड मातीचा भराव अद्यापही काढण्यात आला नसल्याने खाडीपात्रातील पाण्याचा प्रवाहच बदलला आहे. तर पुलाच्या दोन्ही बाजूला मोठे खड्डे पाडण्यात आले असून त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. एकूणच पुलाच्या दुरुस्तीबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात असून ग्रामस्थ व वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जीर्ण झालेल्या कोळंब पुलाच्या आतील शिगा गंजून गेल्याने कमकुवत बनलेला पूल वाहतुकीस धोकादायक झाल्याने दोन वर्षांपासून पुलावरून एसटी व अन्य अवजड वाहतूक बंद होती. पूल दुरुस्तीसाठी सुरूवातीला चार कोटी निधी मंजूर झाला. मात्र, त्यानंतर जादा दुरुस्तीसाठी पुन्हा साडेतीन कोटी रुपयांचा निधी पूल दुरुस्तीसाठी मंजूर झाला. त्यानंतर सतत मुदतवाढ घेत ठेकेदाराकडून पूल दुरुस्ती सुरूच होती.
पूल दुरुस्ती कामाबाबत दर्जा व गती पाहून सातत्याने तक्रारी होत होत्या. एकदा तर बांधकामावर खाडीतील खारे पाणी मारताना ग्रामस्थांनी ठेकेदार कामगारांना रंगेहात पकडले होते. मात्र ,कोणतीही कारवाई झाली नाही. दुरुस्ती दरम्यान पूल बंद असल्याने कोणतीही पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते. काही काम शिल्लक असताना जुलै 2019 मध्ये पुलावरून एसटी वाहतूक सुरू झाली. मात्र, बांधकाम विभागाने पुलाच्या केलेल्या तपासणीत पूलावरून 20 टन वाहतुकीसच परवानगी मिळाली. त्यामुळे अतिअवजड वाहतूक जादा क्षमतेचे डंपर ट्रक पुलावरून जाऊ शकणार नाही. त्याबाबत फलकही पुलाच्या दोन्ही बाजूला लावण्यात आले आहेत. एकूणच सात ते आठ कोटी दुरुस्तीसाठी खर्च करून पुलावरून मर्यादित स्वरूपात वाहतूक होणार असेल, दुरुस्तीचे कामही अर्धवट असेल, पुलावरून वाहतूक करतानाही धोकादायक स्थिती कायम असेल, तर पूलाच्या दुरुस्तीच्या कामाबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.





























































