
सामना प्रतिनिधी । मुंबई
‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स इप्रुव्हमेंट ट्रस्ट’चे कालकथित अध्यक्ष प्रा. व्ही. एस. आसवारे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठीची सभा रविवारी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेला रिपब्लिकन, दलित नेत्यांसहित विविध क्षेत्रांतील नामवंत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ऍड. सुशील आसवारे यांनी दिली.
ही श्रद्धांजली सभा दादर (पूर्व), गोकुळदास पास्ता लेन येथील डॉ. आंबेडकर भवन येथे होणार आहे. प्रा. आसवारे यांचे १६ जून रोजी अल्पशा आजाराने मालाड येथील राहत्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. दादरच्या ‘आंबेडकर भवन’च्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. पीपल्स इप्रुव्हमेंट ट्रस्टमध्ये आसवारे हे १९९२ सालापासून विश्वस्त म्हणून कार्यरत होते. फोर्टमधील सिद्धार्थ कॉलेजमध्ये विद्यार्थीप्रिय आणि व्यासंगी प्राध्यापक असा लौकिक होता. दलित पँथरच्या आधी १९७० सालात स्थापन झालेल्या रिपब्लिकन क्रांती दलाच्या उभारणीत त्यांचा पुढाकार होता. दलितांच्या जमिनी साखर कारखान्यासाठी हडप केल्याच्या विरोधात प्रा. आसवारे यांनी पुणे जिल्हय़ातील आंबेगाव तालुक्यात आंदोलन केले होते.































































