
मराठा बांधवांनो तोडफोड करु नका, आपण त्याचे समर्थन करत नाहीत. आपल्याला शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचे आहे, असे आवाहन मराठा समजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा तरुणांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याच्या घटनेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जी तोडफोड करण्याचे वृत्त आले आहे, ती तोडफोड मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा समाजाच्या मुलांनीच केली आहे हे कशावरुन ठरवले, असा सवालही त्यांनी. दुसऱ्या कोणीही हे केल्याची शक्यता आहे. आपली मराठा समाजाची मुले असे काही करतील, असे मला वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या समजातील कोणीही तोडफोड करू नये, आपल्याला शांततेत लढाई करायची आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल मला काहीच बोलायचे नाही. ते महान व्यक्ती आहेत. त्यांना कोणताही समाज असला तरी गरळ ओकण्याची विष पेरायची सवय आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचे नाही. समाजाचा निर्णय समाज घेतोय पण या हल्ल्याचे समर्थन करणार नाही ते समर्थनायोग्य नाहीये, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या तोडफोडीबाबत मला काहीच माहित नाही. मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. हजारो गावात आंदोलन सुरु आहे. कोणी गाडी फोडली असेल तर त्याचे समर्थन होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठ्यामध्ये माणुसकी जिवंत आहे. मराठ्यांनी सरकारचे खूप लाड केले. त्यांची पोरबाळे आम्ही मोठे केली. समाजातील कोण मराठ्यांना आरक्षण मिळवू देत नाहीत हे सर्वांना माहित आहे. मराठा समाजाने या श्रद्धेयांना खूप मोठे केले आहे. खूप लाड आहेत. ते आता विमानाने फिरतात. मराठ्यांनी मोठे केल्यामुळे त्यांची मुलं श्रीमंतीत जगतात. यांची माहिती काही दिवसात मी समोर आणणार आहे. सगळ्या राजकीय पक्षाची लोकं, सत्तेतील लोके मराठ्यांना मोठं होऊ देत नाहीत, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
षडयंत्र उधळून लावणार
मनोज जरांगे पाटील यांचे लाड झाल्याचा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता. त्यालाही जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. आमच्याकडूनच त्यांचे लाड झाले आहेत. 70 वर्षात आमच्याकडून लाड झालेत. आम्ही मराठ्यांनी खूप लाड केलेत. खूप मोठं केलं. त्यांची मुलं मोठी झाली. आमची मुलं मोठी करायची आहेत. मराठ्यांची मुलं मोठी होऊ नये म्हणून त्यांचे चारही बाजूने प्रयत्न सुरू आहेत. पण त्यांचं षडयंत्र आम्ही उधळून लावणार आहोत, असा इशाराही जरांगे- पाटील यांनी दिला.
जखमेवर मीठ का चोळता?
तुम्हाला आरक्षण द्यायचे नव्हते तर कशाला वेळ घेतला? तुम्ही 50 वर्षाचा वेळ देता का म्हणून विचारायचे होते ना? आम्ही तुम्हाला वेळ दिला होता. आम्ही चार दिवसाचा वेळ दिला होता. तुम्ही म्हणाला चार दिवसात तुमच्या मागणीप्रमाणे कायदा पारीत होणार नाही. तुम्ही एक महिन्याचा वेळ मागितला. आता आणखी वेळ मागून नाटकं शिकवायला लागले का आम्हाला? मराठ्यांनी तुम्हाला ओळखले आहे. त्यामुळे मराठ्यांनी ठरवले, आम्ही तुमच्या दारात येत नाही. तुम्ही आमच्या दारात येऊ नका. किती सोपा विषय आहे. आमच्या जखमेवर का मीठ चोळत आहात? असा संतप्त सवालही त्यांनी केला.


























































