
मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आजरा तालुक्यातील वाटंगी गावात उमटले. येथील ‘पाणीपुरवठा योजने’चे उद्घाटन करण्यासाठी आलेले खासदार संजय मंडलिक आणि आमदार राजेश पाटील यांच्या गाडय़ांचा ताफा आंदोलकांनी रोखला. निषेधाच्या घोषणा देत काळे झेंडे दाखविले. मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहून खासदार मंडलिक आणि आमदार पाटील यांना उद्घाटन न करताच माघारी फिरावे लागले.
‘पाणी योजने’च्या उद्घाटनासाठी खासदार मंडलिक आणि आमदार पाटील येणार होते. त्यांना विरोध करण्यासाठी वाटंगी बसस्थानक परिसर व गावात मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. हातामध्ये काळे निशाण घेऊन आंदोलक निषेधाच्या घोषणा देत होते. खासदार, आमदारांचा ताफा येताच, तो गावच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आला. कार्यकर्ते गाडीसमोर झोपले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, मराठा आरक्षणाची कागदपत्रे घेऊन या आणि मग उद्घाटन करा, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यानंतर उद्घाटन करताच, खासदार मंडलिक आणि आमदार पाटील यांना परत फिरावे लागले.
विशेष अधिवेशन बोलवा – सतेज पाटील
मराठा आरक्षणासंदर्भात दिलेली वेळ राज्य शासनाने पाळलेली नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला दोन वेळा गेले; पण त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. मराठा आरक्षणासाठी शासनाने विशेष अधिवेशन बोलावून तत्काळ निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, मराठा आंदोलनाला काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसच्या आमदारांचा जाहीर पाठिंबा आहे, असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार जयश्री जाधव, आमदार राजुबाबा आवळे उपस्थित होते.
शिंदे, फडणवीसांच्या प्रतिमेला काळे फासले
इचलकरंजी शहरातील मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले असून, आज प्रांत कार्यालयासमोरून जाणाऱया एसटी बसला थांबवून त्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला आंदोलकांनी काळे फासले. यानंतर काहींनी वाद घातला; मात्र तो नंतर मिटला. आज प्रांत कार्यालयासमोर हवामहल बंगला चौकात मराठा कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण केले आहे.
हुपरीत लाक्षणिक उपोषण सुरू
हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. जोपर्यंत जरांगे पाटलांचे उपोषण संपत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत सदस्याच्या खुर्चीवर बसायचे नाही, असा निर्णय इंगळी ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत सर्वानुमते घेऊन उपोषणास पाठिंबा दिला आहे. यावेळी सरपंच दादासाहेब मोरे, उपसरपंच सुमय्या नायकवडे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
सदावर्तेंच्या प्रतिमेला दिला ‘शॉक’
गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील यांच्या विरोधात झटके आल्यासारखे वक्तव्य करणाऱया गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिमेला झटके देण्यात आले. ‘संभाजी ब्रिगेड’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यानंतरही सदावर्ते यांची बुद्धी सुधारली नाही तर ‘संभाजी ब्रिगेड’कडून त्यांना खरोखरचा ‘शॉक’ देण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष नीलेश सुतार यांनी दिला. यावेळी मराठा सेवा संघाचे संजय साळोखे, नीलेश सुतार, ‘जिजाऊ ब्रिगेड’च्या चारुशीला पाटील, अभिजित भोसले, भगवान कोईगडे, कल्पना देसाई, उमेश जाधव, संगीता पाटील, संतोष सिद्ध, अमित सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा
उपसमितीचे अध्यक्षपद मराठा मंत्र्याकडे असताना, त्यांच्याऐवजी अमराठा नेता चर्चेला का पाठविला जातो, असा सवाल करत उपसमितीच्या अध्यक्षपदाचा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी येथील सकल मराठा समाजाच्या समन्वयकांकडून पत्रकार परिषदेत करण्यात आली. ऐतिहासिक दसरा चौकात मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू आहे. यावेळी वसंत मुळीक, ऍड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे, शाहीर दिलीप सावंत, शशिकांत पाटील, अनिल घाटगे आदी उपस्थित होते. आज मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंदोलकांची भेट घेतली. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली.
एसटीवरील पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्राला फासले काळे
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला गडहिंग्लज येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण करत पाठिंबा दिला. आंदोलकांनी आज एसटी बसेसवरील जाहिरातीत असणाऱया पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या छायाचित्रांना काळे फासले. दरम्यान, आरक्षण मिळेपर्यंत गडहिंग्लज तालुक्यातील विविध गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसे फलक गावागावांत लावण्यात आले आहेत. उपोषणात मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष आप्पा शिवणे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.





























































