
कोरोनाचे संकट पाहता देशात 25 मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) मधून मोठ्या प्रमाणात रक्कम काढली आहे. 25 मार्च ते 31 ऑगस्ट या कालावधीत कर्मचाऱ्यांनी पीएफमधून 39 हजार 402 कोटी रुपये काढल्याची माहिती सोमवारी लोकसभेत देण्यात आली.
लोकसभेत लेखी उत्तरात केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले की एकूण 39 हजार 402 कोटी 94 लाख रुपयांचा पीएफ निधी लॉकडाऊनच्या काळात वितरित करण्यात आला. 25 मार्च ते 31 ऑगस्ट 2020 या काळात महाराष्ट्रातून सर्वाधिक पीएफ रकम काढण्यात आली. महाराष्ट्रातून 7837 कोटी 85 लाख एवढी रक्कम गेल्या पाच महिन्यांत काढण्यात आली.
त्याखालोखाल कर्नाटक राज्यातील 5742 कोटी 96 लाख रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आली. तामिळनाडू- पॉंडेचरीत 4984 कोटी 51 लाख रुपये तर दिल्लीमध्ये या काळात 2940 कोटी 97 लाख रुपये पीएफ निधीतून वितरित करण्यात आले आहेत. आर्थिक संकट बघता कामगार आणि रोजगार मंत्रालयाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपाययोजना केल्याची माहिती लेखी उत्तरात संतोष गंगवार यांनी दिली.
























































