पुण्यात कोविड सेंटरमधील तब्बल 90 टक्के बेड रिकामे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, रुग्णसंख्यादेखील मोठ्या प्रमाणात घटली आहे. शहरातील विलगीकरण केंद्रांमध्ये (कोविड सेंटर) पंधरवड्यापूर्वी असलेली दोन हजार 180 रुग्णसंख्या आज 227 पर्यंत घटली आहे. कोरोनाबाधितांमधील सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी महापालिकेची सध्या फक्त पाच विलगीकरण केंद्रे सुरू आहेत. तर घरीच राहून उपचार घेत असलेले रुग्णही 2 हजार 736 पर्यंत कमी झाले आहेत.

शहरात 25 मार्चला विलगीकरण केंद्रांमध्ये साडेचारशे बेड होते. त्यावेळी 207 बेडवर रुग्ण होते. एप्रिलअखेरीला बेडची संख्या एक हजार पर्यंत वाढली त्यावेळी 998 बेड भरले होते. 13 मे रोजी महापालिकेच्या व खासगी कोविड केअर सेंटरमध्ये 3 हजार 608 बेड उपलब्ध होते. त्यापैकी दोन हजार 180 बेडवर रुग्ण होते, तर एक हजार 428 बेड रिकामे होते. आज सुमारे साडेतीन हजार बेड म्हणजे जवळपास 90 टक्के बेड रिकामे आहेत.

पालिकेने अनेक विलगीकरण केंद्र बंद केली असून, सध्या महापालिकेतर्फे सध्या गंगाधाम, खराडी, संत ज्ञानेश्वर वसतिगृह, हडपसर येथील बनकर आणि एसएनडीटी येथे विलगीकरण केंद्रे सुरू आहेत. या पाच केंद्रांमध्ये मिळून सुमारे दीड हजार बाधितांना ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, सध्या या ठिकाणी 227 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहेत. सौम्य लक्षणे असलेले रुग्ण  विलगीकरण केंद्रात ठेवले जातात. त्यांना औषधे दिली जातात. महापालिकेच्या केंद्रांमध्ये एक हजार 550 बेड आहेत. खासगी रुग्णालये व संस्थांच्या एकूण 34

विलगीकरण केंद्रांमध्ये 1 हजार 997 बेडची व्यवस्था होती महापालिकेच्या सेंटरमध्ये आता अडीचशेपर्यंत रुग्ण आहेत. खासगीमध्ये दोनशेच्या आसपास रुग्ण आहेत. अनेक खासगी केंद्रे रुग्ण नसल्यामुळे बंद झाली आहेत. घरी राहून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या एप्रिलमध्ये खूप वाढली होती. 18 एप्रिल रोजी सर्वाधिक 47 हजार 329 रुग्ण गृह विलगीकरणात होते. लॉकडाऊनच्या काळात संसर्ग कमी होत गेल्याने सौम्य लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची संख्या घटली. घरी असलेल्या रुग्णांची संख्या आज चार हजार 681 पर्यंत कमी झाली आहे. रुग्णालयात आज दोन हजार 736 रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्याधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली.