आळंदीत इंद्रायणी नदीला पूर , भक्त पुंडलिक मंदिरात पाणी, दर्शन बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आळंदी येथुन वाहणा-या इंद्रायणी नदीचे पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रात होत असलेल्या जोरदार संततधारेच्या पावसाने अलंकापुरीत इंद्रायणी नदीला आलेल्या पुराचे पाण्याने इंद्रायणी नदीने काठ सोडला आहे. पुराचे पाणी दुतर्फा पसरले असून नदी काठाचे रस्ते रहदारीला बंद झाले आहेत. या महापुराचे पाणी शनी मारुती मंदिर परिसर , राम घाट, भक्त पुंडलिक मंदिर, स्वामी महाराज मठ मागील चौंडी घाट परिसरात घुसले आहे. यामुळे नदी घाटावर अनेक ठिकाणी रहदारी बंद झाली आहे.

पुराचे पाणी पाहण्यास नदी घाटावर तसेच पुलांचे वर दुतर्फा भाविकांसह नागरिकांनी गर्दी करुन पुराचे पाणी पाहत सेल्फी चा आनंद लुटत आहेत. दक्षता म्हणून पुलांवर जास्त वेळ उभे राहू दिले जात नाही. इंद्रायणी नदी घाटाचा परिसर,भक्ती पुंडलिक मंदिरात पाणी शिरले असून श्रींचे दर्शन बंद झाले आहे. इंद्रायणी नदी वरील घाटा लगतचे महात्मा गांधी यांचे रक्षा विसर्जन स्थळ स्मारकास पाण्याने वेढले आहे. भक्ती सोपान पुलाला पाणी लागले असून येथील दोन के. टी बंधारा पाण्यात बुडाले आहे.

नदी घाटावरील अनेक संत, महाराज यांचे समाधी पाण्यात बुडालेल्या आहेत. नदीचे दुतर्फा रस्ते रहदारीला धोकादायक असल्याने नागरिकांनी, भाविकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले आहे. अग्निशामक विभाग, आपत्ति व्यवस्थापन कक्ष तैनात करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी जाधव यांनी दिली .

आळंदी पंचक्रोशीत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे आळंदीतील रस्त्यांवर पाणी वाहत आहे. सांडपाणी वाहू नलिका क्षमते पेक्षा जास्त पाणी येत असल्याने अनेक ठिकाणी चेंबर मधून पाणी उफाळलेले आहे. चेंबर तुंबल्याने तसेच पाणी जाण्यास मार्ग मिळत नसल्याने हजेरी मारुती मंदिरालगत प्रदक्षिणा मार्गावर पाणी साचत आहे.

आळंदी नगरपरिषदेने नदीचे दुतर्फ़ा कर्मचारी तैनात केले असून जीवित हानी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जीव रक्षक तैनात असून खडा पहारा ठेवला आहे. आळंदी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागानेसह आपत्ती व्यवस्थापन कक्षातुन नदी घाटावर नजर ठेवण्यात येत आहे. इंद्रायणी नदी घाटावरील भक्ती सोपान पूल, भक्त पुंडलिक मंदिर, जोग महाराज यांची समाधी पुराचे पाण्याचे विळख्यात आहे. आळंदी नदीच्या दुतर्फा रस्ते धोकादायक असल्याने रहदारीस पर्यायी रस्ते वापरण्याचे आवाहन मुख्याधिकारी अंकुश जाधव आणि आळंदी मंडलाधिकारी स्मिता जोशी यांनी केले आहे. सर्वत्र जोरदार पाऊस होत असल्याने बळीराजात समाधान आहे. पुढील वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली असून अतिरिक्त होत असलेल्या पावसाने उजनी धरण भरण्यास उपयुक्त होणार आहे.

परिसर कचरामुक्त ठेवण्यास प्रशासनाने प्राधान्य देत पुराचे पाण्यात वाहून आलेला कचरा व जलपर्णी काढण्याचे कामास गती देण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले. पाण्याने नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. नदी परिसर भाविकांचे लक्ष वेधून घेत असल्याने नदीवर दुतर्फा गर्दी दिसत आहे. पावसाने धुळीचे साम्राज्य कमी झाले आहे. मात्र शहरातील पद्मावती रस्त्याची दुरावस्था काही प्रमाणात कायम असल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. या रर्स्त्याचे विकास काम सुरु असल्याचे आळंदी प्रशासनाने सांगितले.