
दुचाकीवर चाललेल्या ओळखीतील तरूण न थांबल्याने टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. ही घटना १३ नोव्हेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास बिबवेवाडीतील पापळवस्तीवर घडली.
उमेश जगधाने, योगेश जगधाने, मयूर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. धीरज वन्नम वय 25 रा. बिबवेवाडी असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धीरज आणि आरोपी ओळखीचे असून बिबवेवाडीत राहायला आहेत. 13नोव्हेंबरला धीरज मित्रासोबत दुचाकीवरून चालला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला आवाज देउन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, धीरज न थांबल्यामुळे टोळक्याने त्याचा पाठलाग करून कोयत्याने वार करीत गंभीररित्या जखमी केले. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस तपास करीत आहेत.





























































