बेशिस्तांनो आता वाहन जप्तीचीही होणार कारवाई, निर्बधाची कडक अमंलबजावणीचे सहपोलीस आयुक्तांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी आणि जमावबंदीला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र, काही बेशिस्तांकडून विनाकारण भटंकती केली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संबंधितांविरूद्ध दंडात्मक कारवाई करून लायसेन्स आणि वाहनजप्ती करण्यात येणार आहे. शहरात आता निर्बधाची कडक अमंलबजावणी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.

निर्बधाबाबत नागरिकांनी माहिती व्हावी यासाठी शहरात दोन पोलिसांकडून सहकार्य करण्यात आले. मात्र, आजपासून कडक निर्बधाची अमंलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार विनाकारण भटवंâती, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली फिरणे, विनामास्क प्रवास, कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई तीव्र केली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांनी पुरावा दाखविल्यानंतर सोडले जाणार आहे. रूग्णसेवा, भाजीपाला, अत्यावश्यक सेवेतील वाहनचालकांना सुट दिली जाणार आहे. मागील दोन दिवसांपासून पोलिसांनी ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृतीला प्राधान्य दिले आहे. मात्र, तरीही काहीजणांकडून विनाकारण नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे संबंधितांविरूद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले.

पोलिसांच्या मदतीला एसपीओंची धाव

शहरात पहिल्या लॉकडाउनपासून पोलिसांच्या मदतीला असलेल्या साध्या वेशातील विशेष पोलीस अधिकाऱ्यांची ( एसपीओ) मदत पुन्हा घेतली जात आहे. त्यानुसार विविध ठिकाणच्या नाकाबंदीदरम्यान एसपीओंद्वारे वाहन चालकांकडे विचारपूस करणे, अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना मदत करणे, विनाकारण भटकंती करणाऱ्यांना सूचित करणे, कोरोना जनजागृती करण्यावर भर देण्याचे काम केले जात आहे. पोलिसांच्या मदतीला एसपीओ असल्यामुळे त्यांचे काम हलके झाले आहे.

बेशिस्तांविरूद्ध कारवाईचा वेग वाढला

नाकाबंदीदरम्यान पोलिसांकडून वाहनचालकांकडे विचारपूस केली जात आहे. त्यानुसार मागील दोन दिवसांत दीड हजार बेशिस्त आणि विनाकारण भटकंती करणारे रडारवर आले आहेत. त्यांच्याविरूद्ध कारवाई करून दंडात्मक वसुली करण्यात आली आहे. त्याशिवाय लायसेन्स आणि वाहनजप्तीवरही भर देण्यात आला असल्याचे दिसून आले आहे. शासन आदेशानुसार नागरिकांनी नियमांची अमंलबजावणी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

आयुक्तांसह सहपोलीस आयुक्तांकडून आढावा

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पोलिसांकडून नियमांची कडकपणे अमंलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. अमिताभ गुप्ता आणि सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, प्रत्येक झोनचे पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावर उतरून कामगिरीला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून आले आहे.