
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे कार्यकर्ते आणि माळेगाव पणदरे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी तावरे यांच्या पतीवर दोघा अज्ञाताने जवळून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना आज रात्री सातच्या सुमारास माळेगावमध्ये घडली आहे. गोळीबारात रविराज सदाशिव तावरे (वय 41) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णालय प्रशासनाला फोन करून रविराज यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. त्याशिवाय आमदार रोहित पवार यांनीही त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे.
रविराज तावरे आणि त्यांच्या पत्नी रोहिणी आज संध्याकाळी सातच्या सुमारास माळेगाव परिसरातील एका वडा पाव विक्रीच्या गाड्याजवळ थांबल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा अज्ञातांनी रविराज यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे एक गोळी त्यांच्या छातीत शिरल्यामुळे ते गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यानंतर रोहिणी यांनी आरडाओरडा केल्यामुळे जवळील लोकांनी त्याठिकाणी धाव घेत रविराज यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली आहे.
























































