
लग्नानंतर विवाहितेला नवीन फ्लॅट आणि जागा घेण्यासाठी माहेरहून पैशाची मागणी करत छळ केल्यामुळे तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना धनकवडी परिसरातील बालाजीनगरमध्ये घडली.
भाग्यश्री निशिकांत निवगुणे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी निशिकांत निवगुणे याच्यासह पाच जणांविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशिकांत आणि भाग्यश्री यांचे डिसेंबर 2012 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर निशिकांत आणि इतर नातेवाईकांनी भाग्यश्री यांना माहेरहून फ्लॅटसाठी पैसे मागण्याचा तगादा लावला. पैसे न आणल्यास सासरच्या लोकांनी भाग्यश्रीच्या भावाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे शारीरिक व मानसिक छळास कंटाळून भाग्यश्री यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक घाटगे तपास करीत आहेत.


























































