
येरवड्यातील भाजी मार्केट परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून 19 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येरवड्यातील भाजी मार्केट परिसरातच ही कारवाई करण्यात आली. शहरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या मटका, जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. यानुसार, भाजी मार्केट परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये काही जण जुगार खेळत आणि खेळवत असल्याची माहिती पथकाला मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने सापळा रचला आणि 19 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य, असा 22 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक आश्विनी पाटील, अनिकेत पोटे, अंमलदार अण्णा माने, प्रमोद मोहीते, इरफान पठाण यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
























































