Pune news – 50 तोळे सोने, लाखोंचा हुंडा दिल्यानंतरही छळ अन् बळजबरीने गर्भपात; महिला सरपंचाच्या घरात हुंडाबळी, सुनेनं जीवन संपवलं

सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळामुळे वैष्णवी हगवणे या नवविवाहितेने आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यात असाच एक प्रकार घडला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी गावच्या महिला सरपंचाच्या सुनेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सरपंच महिलेसह चौघांविरुद्ध ऊरळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीप्ती रोहन चौधरी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी तर दीर रोहित चौधरी यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीप्तीच्या आईने ऊरळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोरतापवाडीतील कड वस्ती परिसरात महिला सरपंच राहायला आहे. शनिवारी सायंकाळी दीप्ती चौधरी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. दीप्तीचा विवाह 2019 मध्ये झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच माहेरून पैसे आणण्याची मागणी सासरकडील मंडळींकडून सुरू झाली होती. वेळोवेळी पैसे देऊनही दीप्तीचा छळ सुरू होता. आरोपींनी दीप्तीला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले होते, असेही दीप्तीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे.

Pune News – माता न तू वैरिणी! वाघोलीत कौटुंबिक वादातून आईकडून दोन मुलांवर हल्ला; मुलाचा मृत्यू

विवाहाच्या वेळी पन्नास तोळे सोन्याचे दागिने, रोकड दिली होती. हुंडा दिल्यानंतर तिला त्रास देण्यात येत होता. मानसिक दबाव आणि शारीरिक छळ असह्य झाल्याने अखेर दीप्तीने आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे तपास करत आहेत.