पुणे – विवाह नोंदणी करण्याआधीच प्रियकर कागदपत्रे घेऊन पळाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रियकर तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत तरूणाने लग्नाचे रजिस्ट्रेशन करण्याआधीच कागदपत्रे घेऊन पळाल्याचा धक्कादायक प्रकार मामलेदार कचेरीत घडला आहे. याप्रकरणी संबंधित तरूणासह त्याला मदत करणाऱ्यांविरूद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेजस सुरेश शेलार (33, रा. रासाई बंगला, एरंडवणे), अमित यशवंतराव पापळ (35), अभिषेक यशवंतराव पापळ (33 दोघेही रा. पुणे) आणि त्यांच्या एका 35 वर्षाच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गोव्यातील एका 28 वर्षीय तरूणीने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ऑक्टोबर 2019 ते 13 फेबुरुवारी 2021 दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तेजस शेलार याने फिर्यादीला तु मला आवडते माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे बोलून तिच्यासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिचा विश्वास संपादित झाल्यावर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर तेजसने जानेवारी 2021 नाशिक येथील हॉटेलमध्ये थांबलेले असताना त्याच्या ओळखीच्या आरोपींची पोलिस असल्याची ओळख करून तरूणीचा मोबाईल फोन, मतदार कार्ड काढून घेतले. त्यानंतर तरूणीला 13 फेबुरुवारीला आपण पुण्यातील मामलेदार कचेरी येथे लग्नाचे रजिस्टेशन करू असे सांगितले. त्यानंतर दोघेही पुण्यातील खडक परिसरातील मामलेदार कचरेरीत लग्ननोंदणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तरूणी वॉशरूमला गेली असताना, तेजस तिला सोडून पळून गेला. तरूणीने दिलेली कागदपत्रेही तो घेऊन गेला आहे. त्यामुळे तेजस आणि त्याला मदत करणाऱ्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.