मूल होत नसल्याने विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारले, पतीसह सासु-सासऱ्यांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मूल होत नसल्याने सासरच्या मंडळींनी महिलेचा छळ करून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने खांद्याचे हाड मोडल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील काळेपडळमध्ये घडली आहे. त्यांचा छळ असह्य झाल्याने अखेर महिलेने याप्रकरणी पती संतोष पवार (22), सासू सिताबाई पवार (45), सासरे शिवाजी दासु पवार (वय 50, सर्व रा. शिवतेजनगर, काळेपडळ, हडपसर) यांच्याविरूद्ध वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

फिर्यादी महिला आणि संतोष यांचे तीन वर्षांपुर्वी लग्न झाले आहे. लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. मात्र लग्नाला बरेच दिवस होऊनही मुल होत नसल्याने सासरच्यांनी तिला दुषणे द्यायला सुरुवात केली. वारंवार मुल न होण्यावरुन मानसिक छळ सुरू केला. तसेच लग्नात खर्च झालेले 10-12 लाख रूपये माहेरहून आणण्याचा तगादा लावला. मात्र महिलेने तसे न केल्याने तिच्या पतीसह सासू-सासऱ्यांनी तिला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण इतकी भयंकर केली की त्यात महिल्याच्या खांद्याचे हाड मोडले आहे. त्याशिवाय फिर्यादी महिलेच्या परवानगीशिवाय सासरच्यांनी संतोषचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न लावले आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस तपास करीत आहेत.