पुणे – खात्यातंर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा रिझल्ट लागेना, राज्यातील 1 हजार 469 कर्मचारी हवालदिल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने पोलीस खात्यातंर्गत घेण्यात आलेल्या उपनिरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल न लागल्यामुळे राज्यभरातील तब्बल 1 हजार 469 उमेदवार हवालदिल झाले आहेत. 10 सप्टेंबर 2017 ला उमेदवारांची पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर अद्यापर्यत परीक्षेचा अंतिम निकाल न लागल्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पोलीस खात्यातंर्गत उपनिरीक्षक पदासाठी 24 डिसेंबर 2017 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर 24 फेब्रुवारी 2020 पासून राज्यातील पुणे, संभाजीनगर, नाशिक, मुंबई, अमरावतीत शारिरीक परीक्षा घेण्यात आल्या. त्यामध्ये 1 हजार 469 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, अजूनही खात्यातंर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल न लागल्यामुळे उमेवारांनी चिंता व्यक्त केली आहे. आयोगाच्यावतीने पूर्व परीक्षा ते अंतिम परीक्षा असा चार वर्षांचा कालावधी लोटूनही अंतिम निकाल लावण्यात आला नाही, असा आरोप उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर अंतिम परीक्षेचा निकाल लावण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.