
‘तू माझी नाहीतर कोणाचीच होऊ देणार नाही,’ असा दम देत 21 वर्षीय तरुणीवर तरुणाने एकतर्फी प्रेमातून अॅसिड हल्ला केला. हा प्रकार ताडीवाला रस्ता परिसरात घडला आहे. या हल्ल्यात तरुणी आणि तिचा मित्र गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर परराज्यात पळून जाणाऱया आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाठलाग केला आणि 24 तासांच्या आत कर्नाटकातील हुबळी येथून त्याला बेडय़ा ठोकल्या. या घटनेने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
श्रीराम वधू सावनेर (30, रा. ग्रामतारण वाडा, जिल्हा बैतुल, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद तरुणी आणि आरोपी मूळचे मध्य प्रदेशचे आहेत. तरुणी पुण्यात एका रेस्टॉरंटमध्ये काम करते. बुधवारी (दि. 20) रात्री ती काम संपवून ताडीवाला रोड येथील राहत्या घराकडे जात होती. यावेळी तिचा एक मित्रही तिच्यासोबत होता.
तरुणी तिच्या मित्रासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याचा राग आरोपी सावनेर याच्या मनात होता. त्यातूनच आरोपीने तरुणीला गाठले. ‘तू माझ्यासोबत का राहत नाही,’ असे म्हणत वाद घातला. काही कळायच्या आत त्याने सोबत आणलेल्या ड्रममधील अॅसिडसारखा घातक पदार्थ तरुणीच्या मानेवर, पाठीवर आणि दोन्ही पायांवर फेकला. या हल्ल्यात तरुणीला वाचवण्याच्या प्रयत्नात तिचा मित्रही जखमी झाला.
तीन वेळा वेषांतर अन् 50 हून अधिक सीसीटीव्ही
पसार झालेल्या आरोपीच्या मागावर दोन पथके होती. पोलिसांनी ताडीवाला रोड आणि पुणे स्टेशन परिसरातील 50 हून अधिक सीसीटीव्ही क@मेऱयांचे फुटेज तपासले. त्यावरून आरोपी चालुक्य एक्प्रेसने कर्नाटकात पळून गेल्याचे निष्पन्न झाले. ओळख लपविण्यासाठी त्याने तीन वेळा वेषांतर केले. आरोपी हुबळी येथे उतरणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
































































