
पुणे येथे ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकने दिलेल्या धडकेत चार वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी नवले ब्रिजजवळ घडली. अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दोन आठवड्यांपुर्वी मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल होऊन असाच भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये एकाच जागीच मृत्यू झाला होता. तर 9 जण जखमी झाले होते.
पोलिसांनी ट्रकचालक चित्रपाल जनरलसिंग (वय 29, रा. मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालक चित्रपाल हा नवले पुलाकडून मुंबईच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी हॉटेल विश्वा समोर आल्यानंतर ट्रक अचानक बंद पडला. त्याचे ब्रेक निकामी झाल्यामुळे त्याने रिक्षाला आणि तीन मोटारीला धडक दिली. त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळच्या वेळी अपघात झाल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.
उतार ठरतोय घातक
कात्रजकडून नवले ब्रिजकडे जाताना उतार असल्यामुळे अनेकवेळा अपघात झाल्याचे दिसून आले आहे. परिसरात वाहनांची संख्या मोठी असल्यामुळे वर्दळही जास्त आहे. त्यातच उताराचा रस्ता असल्याने वाहनांचा वेग वाढल्यामुळे अपघातांची मालिका कायम आहे. परिसरातून माल वाहतूक वाहनांची ये-जा सातत्याने सुरु असते. त्यामुळे तांत्रिक बिघाड झाल्यास अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे.


























































