मोफत साडीचे आमिष पडले पावणेतीन लाखांना, लाल महाल चौकात ज्येष्ठ महिलेचे फसवणूक

आमचे शेठ गरीब महिलांना मोफत साडी वाटप करीत असल्याची बतावणी करीत चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेला बोलण्यात गुंतवून तब्बल पावणेतीन लाखांचे दागिने लंपास केले. ही घटना 7 डिसेंबरला दुपारी तीनच्या सुमारास कसबा पेठेतील लाल महाल चौक परिसरात घडली. याबाबत ज्येष्ठ महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार जेष्ठ महिला बुधवार चौकात राहायला आहेत. बुधवारी (7 डिसेंबर) दुपारी तीनच्या सुमारास महिला लाल महाल चौकातील श्री दत्त मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दोन चोरट्यांनी महिलेला अडवले. ‘आमच्या शेठला मुलगा झाला असून ज्येष्ठ महिलांना साडी वाटप करण्यात येत आहे,’ अशी बतावणी चोरट्यांनी महिलेकडे केली.

त्यानंतर चोरट्यांनी महिलेला बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील दागिने पिशवीत काढून ठेवण्यास सांगितले. महिलेने पिशवीतील पावणे तीन लाख रुपयांचे दागिने ठेवल्यानंतर चोरट्यांनी काही वेळातच दागिने चोरून नेले. महिलेने पिशवीत उघडून पाहिली असता, त्यांना पिशवीतील दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आर पवार तपास करीत आहेत.