
पुणे शहर परिसरात वाहनचोरी करणार्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा यूनिट चारच्या पथकाने पर्णकुटी चौक परिसरातून अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
गोविंदराज उर्फ गोविंद माधवराव वाघमारे (ता. शिरूर, मूळ. रा. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वाढत्या वाहनचोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान संशयीत वाहनचोर वाघमारे हा पर्णकुटी चौक परिसरात असून त्याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून वाघमारेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने शहरातील विविध भागातून वाहने चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून पोलिसांनी पाच दुचाकी जप्त केल्या आहे. यूनिट चारचे पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विकास जाधव, अंमलदार हरीष मोरे, नागेशसिंग कुंवर, मनोज सांगळे, महेंद्र पवार यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

































































