पुणे पोलिसांची आता सायकलवरून गस्त, गल्लीबोळातील गस्तीसाठी महापालिकेकडून सायकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पुणे पोलीस आता गल्लीबोळात सायकलवरून गस्त घालणार आहेत. वर्दळीच्या आणि अरुंद रस्त्यांवर गस्त घालता यावी, यासाठी पुणे महानगरपालिकेकडून पोलिसांना 10 सायकली देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर समर्थ पोलीस ठाण्यांतर्गत हद्दीत सायकलवरून गस्त घालण्याच्या प्रयोगाला आजपासून सुरुवात झाली आहे.

सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त सागर पाटील, भाजप सभागृह नेते गणेश बीडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम उपस्थित होते.

पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या झोपडपट्टी परिसरात अरुंद रस्ते आणि गल्लीबोळ असते. त्यामुळे गस्त घालताना पोलिसांना वाहनांच्या वापरावर मर्यादा येतात. त्यापार्श्वभूमीवर गल्लीबोळातही पोलिसांचे पेट्रोलिंग सक्षम करण्यासाठी सायकलींचा वापर करण्यात येणार आहे.

महापालिकेकडून पुणे पोलिसांना गस्तीसाठी देण्यात आलेल्या अद्ययावत 10 सायकलींना गिअर आहेत. त्यानुसार समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी आजपासून सायकलवरून गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. दिवसासह रात्री ठरावीक वेळेत पोलीस हद्दीत सायकलवरून गस्त घालणार आहेत. सायकलवर गस्तीच्या निमित्ताने प्रत्येक पोलिसांनी दररोज काही अंतर कापल्यानंतर व्यायामाला मदत होणार आहे. त्यामुळे पोलिसांचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होणार आहे.

गुन्हेगारीवर बारीक नजर ठेवण्यास होणार मदत

पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारी थांबविण्यासाठी प्राधान्य देण्यात येते. त्यासाठी बीट मार्शल पेट्रोलिंग, दामिनी मार्शल यांच्याकडून काम पाहिले जाते. दुचाकी आणि चारचाकी वाहनांतून पेट्रोलिंगवर भर देण्यात येतो. मात्र, आता प्रायोगिक तत्त्वावर सायकलींवर गस्त घालण्यात येणार असल्यामुळे हद्दीतील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार आहे. त्याशिवाय पोलिसांचे आरोग्यही सुधारणार आहे.

पोलीस नियंत्रण कक्षात अनेक नागरिकांच्या तक्रारी येत असतात. त्यामुळे अरुंद रस्ते आणि गल्लीबोळात तत्काळ पोहोचण्यासाठी सायकलींचा उपयोग करता येणार आहे. सायकलवरून पोलीस गस्त घालत असल्याचे पाहून गुन्ह्यांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जाण्यासाठी सायकलींचा पर्याय चांगला आहे.
– डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त, पुणे