पुणे : अवघे 212 रुपये वाचविण्यासाठी पोलिसांकडून फायबर काठी खरेदीला ठेंगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
police-fiber-stick

पैसे वाचविण्यासाठी पुणे पोलीस काय शक्कल लढवतील याचा काही नेम नाही. दरवर्षी शासनाकडून गणवेश खरेदीसाठी मिळणाऱ्या 5 हजारांच्या अनुदानातून फक्त 212 रुपये वाचविण्यासाठी बहुतांश पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी आवश्यक फायबरची काठी खरेदी करत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. मिळणाऱ्या अनुदानात 25 वस्तू खरेदीत काठी खरेदीचाही समावेश आहे. मात्र, पैसे वाचविण्यासाठी फायबर काठीची थेट मुख्यालयाकडे मागणी केली जात आहे.

राज्य गृहविभागाकडून दरवर्षी पोलिस शिपायांपासून सहायक पोलीस उपनिरीक्षकांना गणवेश अनुनादानासाठी 5 हजार 167 रुपये मिळतात. त्यामध्ये गणवेशासह 25 वस्तूंची खरेदी करणे संबंधितांना बंधनकारक आहे. मात्र, अनुदानातील 212 रुपये वाचविण्यासाठी बहुतांश कर्मचाऱ्यांकडून फायबर काठी खरेदीला ठेंगा दाखविला जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्याशिवाय अनुदानाची रक्कम बचत करण्यासाठी अनेक कर्मचारी काही वस्तुंची खरेदी करत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बंदोबस्त असताना विविध पोलीस ठाण्यांकडून थेट मुख्यालयाकडे फायबर काठीची मागणी केली जात असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे.

फायबर लाठीची मागणी करण्यासाठी बहुतांश पोलीस ठाण्याकडून मुख्यालयाला सतत अहवाल पाठवला जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून काठी खरेदी होत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तातडीच्या बंदोबस्तासाठी या वर्षात 800 फायबर काठ्या शिवाजीनगर मुख्यालयाकडून पुरविण्यात आल्या आहेत. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या मागणीप्रमाणे काठ्या वितरित करण्यात आल्या आहेत. मात्र, अनुदान स्वीकारूनही फायबर काठ्या खरेदी न केल्यामुळे कर्मचारी ते सहायक उपनिरीक्षक यांच्या वेतनातून प्रत्येकी 212 रुपये कपात करण्यात येणार आहे. त्यानुसार 1 लाख 69 हजार 920 रुपयांची थकबाकी 30 पोलीस ठाण्यांकडून मुख्यालयात जमा करावी लागणार आहे. अनुदान मिळाल्यानंतरही पोलीस कर्मचारी फायबर काठीची खरेदी का करीत नाही, असा प्रश्न अधिकाऱ्यांनाही पडला आहे.

या पोलीस ठाण्याकडे मुख्यालयाची बाकी

खडक, फरासखाना, समर्थ, विश्रामबाग, शिवाजीनगर, डेक्कन, बंडगार्डन, कोरेगाव पार्क, लष्कर, भारती विद्यापीठ, सहकारनगर, स्वारगेट, कोथरुड, उत्तमनगर, वारजे माळवाडी, अलंकार, दत्तवाडी, सिंहगड रोड, चतुःशृंगी, खडकी,विश्रांतवाडी, चंदननगर, विमानतळ, येरवडा, हडपसर, मुंढवा, बिबवेवाडी, कोंढवा, मार्केटयार्ड, वानवडी