आयर्नमॅनकडून पोलिसांना फिटनेसचे धडे, समर्थ पोलीस ठाण्यात कार्यक्रमाचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी बंदोबस्तात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताणाच्या पार्श्वभूमीवर आयर्नमॅन विजेते डॉ. कौस्तुभ राडकर यांचे समर्थ पोलीस ठाण्यात फिटनेसचे धडे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कामावेळी येणाऱ्या ताणतणावाला सामोरे कसे जायचे याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे याच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, एपीआय संदीप जोरे, पोलीस उपनिरीक्षक हेमचंद्र खोपडे, ज्योति कुटे, मीरा त्र्यंबके उपस्थित होते.

डॉ. राडकर म्हणाले, स्विमींग व रनिंग हे प्रकार एकाच वेळेस दिलेल्या 16 तासामध्ये पुर्ण करणे आवश्यक असते. पोलिसांनी स्वतःसाठी एक तास वेळ काढून दररोज व्यायाम करुन आरोग्य सदृढ राखावे. आरोग्य सदृढ असेल तरच समाजाचे आरोग्य देखील सदृढ राहिल असा आरोग्य मंत्र त्यांनी दिला. त्यानंतर उद्योजक दशरथ जाधव यांनी उदयोगाचा सर्व व्याप सांभाळून आयर्नमॅनची 64 व्या वर्षी तयारी करत असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीसांनी देखील स्वतःचे आरोग्याकडे लक्ष देवून व्यायामासोबतच योग्य आहार घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाला डॉ राहुल झांजुणे उपस्थित होते. यावेळी समर्थ पोलीस ठाण्यात उत्कृष्ट कामगिरी करणारे अंमलदार रणजित उबाळे, संतोष काळे, सुशील लोणकर, जितेंद्र पवार, सुभाष पिंगळे, हेमंत पेरण, शुभम देसाई, सुभाष मोरे, निलेश साबळे, सुमीत खुटटे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव, धिरज शिंदे, वनिता गोरे यांचा सत्कार करण्यात आला.