
सामना ऑनलाईन । पुणे
नक्षलवाद्यांना मदत पुरवणाऱ्या पाच जणांविरोधात कारवाई करत पुणे पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. तसेच त्याच्याविरोधातील सबळ पुरावे असल्यानेच ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आज पुणे पोलिसांनी दिली आहे.
भिमा-कोरेगाव प्रकरणाआधी 31 डिसेंबर रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेसाठी मदत पुरवणे, नक्षलवादी संघटनांना मदत करणे, तरुणांची माथी भडकवणारे साहित्य पुरवणे असे आरोप वरवरा राव, अरुर परेरा, गौतम नवलखा, वर्णन गोन्सालवीस, सुधा भारद्वाज यांच्यावर होते. विश्रामबाग पोलीस ठाण्यात तशी तक्रार दाखल करण्यात आली होती. एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या कागदपत्र, ई-मेल यामधून या लोकांची नावे समोर आली असून त्यांच्याविरोधात पुणे पोलिसांकडे सबळ पुरावे असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
एल्गार परिषदेच्या आयोजना प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी, माओवादी संबंधाचे पुरावे मिळाले आहेत. तसेच पत्र मेलसह अनेक महत्वाचे पुरावे मिळाले असून कबीर कला मंच, सीपीआय, माओवादींकडून निधी पुरवला गेला असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली. सरकार विरोधात कृत्य करण्या संदर्भातील पुरावे मिळाले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था उलथून टाकण्याचा प्रयत्न केला जात होता, असेही त्यांनी सांगितले. पुण्यात झालेली एल्गार परिषद आणि बंदी माओवादी संघटनेच्या कटात या पाच आरोपींचा सहभाग होता, असे स्पष्ट पुरावा हाती लागले आहेत. नक्षवाद्यांसाठी निधी गोळा करणे, पुरवणे विद्यार्थ्यांना भडकवणे, शस्र जमा करणे असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. कबीर कला मंच या संस्थेला पैसेही पुरवले असून देशातील महत्वाच्या व्यक्तींवर हल्ला करण्याची तयारी सुरू असल्याचे तपासात पुढे आल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.






























































