
लूटमार करण्यासाठी चोरटे कशाचाही बहाणा करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. रस्त्याने चाललेल्या तरुणाला, अहो तंबाखू आहे का, अशी विचारणा करीत बोलण्यात गुंतवून दुचाकीस्वार चोरट्यांनी 20 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले आहेत. ही घटना 15 मेला कोंढव्यातील इंदिरानगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी महमंद सद्दाम हुसेन (28, रा. वानवडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महमंद आणि त्यांचे मित्र 15 मेला दुपारच्या सुमारास कामावर पायी चालले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी महमंद यांना हाक मारून तुमच्याकडे तंबाखू आहे का, अशी विचारणा केली. त्यानंतर चोरट्यांनी महमंद यांच्यासोबत गप्पा मारण्याचा बहाणा करीत त्यांच्याकडील आणि मित्र परवेज यांचा असे दोन मोबाईल हिसकावून नेले. महमंद आणि त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा करेपर्यंत चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक खेतमाळीस तपास करीत आहेत.


























































