
राज्यभरातील मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहातंर्गत न्यायाधीन असलेल्या बंदीवानांचा कौटुंबिक दुरावा आता संपुष्टात आला आहे. कारण बंदीवानांच्या कुटूंबियांना त्यांची भेट घेता यावी, यासाठी कारागृह प्रशासनाच्यावतीने गळाभेट उपक्रमाच्या अंमलबजावणीला पुन्हा एकदा गती देण्यात आली आहे. उपक्रमातंर्गत 16 वर्षांखालील मुलांना न्यायाधीन बंदीवानांना भेटण्यासाठी एक तासांचा वेळ देण्यात येत आहे. त्यामुळे बंदीवानांमध्ये सकारात्मक भावना जागृत होण्यास मदत झाली आहे. कोरोना महामारीनंतर संबंधित उपक्रमामध्ये खंड पडला होता. मात्र, आता हळूहळू उपक्रमाच्या अंमलबजावणीला प्राधान्य देण्यात आले आहे.
गुन्हा केल्यानंतर संबंधिताला कारागृहाची पायरी ओलांडावी लागते. त्यामुळे त्यांना कुटूंबियांपासून दुरावा निर्माण होतो. मात्र, नात्यातील आपुलकी जपल्यास न्यायाधीन बंदीवानांमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून आले होते. त्यापार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाच्यावतीने गळाभेट उपक्रमाची अमलबजावणीला प्राधान्य देण्यात आले. न्यायाधीन बंदीवानांची कुटूंबियाशी जवळीक वाढविल्यास त्यांच्याकडून कारागृह सुधारणा व पुर्नवसनाला चांगला प्रतिसाद दिला जातो. विशेषतः कित्येक दिवसांनी मुलांचा स्पर्श झाल्यानंतर बंदीवानांमध्ये सकारात्मकता येत असल्याचे निरीक्षण नोदंविण्यात आले होते. न्यायाधीन बंदीवानांना गळाभेट उपक्रमातंर्गत कौटुंबिक जिव्हाळा जपण्यासाठी कारागृह प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गळाभेट उपक्रमाला आडकाठी निर्माण झाली होती. मात्र, आता पुन्हा काही मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहातंर्गत गळाभेट उपक्रमाद्वारे बंदीवानांचा नात्यातील दुरावा कमी होत आहे.
बहुतांश वेळा न्यायाधीन बंदी म्हणून दाखल झालेल्या बंदीना शिक्षा झाल्यानंतर त्यांचा कौटुंबिक सुसंवाद कमी होतो. दरम्यानच्या काळात घरातील नवजात मुलांनाही त्यांना स्पर्श करता आलेला नसतो. त्यांना जवळ घेउन मायेची भेट दुरापस्त झालेली असते. मात्र, गळाभेट उपक्रमाद्वारे बंदीवानांना नात्यातील ओलावा जपण्यास मदत झाली आहे. उपक्रमातंर्गत बाप-लेकामधील सुसंवाद झाल्याने घरामधील कौटुंबिक विषय, आई-वडिलांची तब्येत विचारपूस केली जाते. त्याशिवाय शिक्षण, वाईट घटनांपासून दूर रहा, चुकीच्या मार्गाला जाउ नकोस, अभ्यास कर, कुटूंबियाची काळजी घे अशाप्रकारचे मार्गदर्शन बंदीवानाकडून मुलांना केले जाते. त्यामुळे गळाभेट उपक्रमातंर्गत बंदीवानांच्या विचारात आणि आचरणात सकारात्मक बदल घडत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
प्रकृतीसाठी बंदीवानांचा योगाभ्यास
कारागृहातील बंदीवानांच्या प्रकृतीला चालना देण्यासाठी योगाभ्यास घेतला जात आहे. त्याद्वारे योगाभ्यासची परिक्षा आयोजित करून, चांगल्या गुणांनी परिक्षा पास झालेल्या बंदीवानांच्या शिक्षेत माफी देण्यात येत आहे. बंदीवानांना प्रोत्साहन मिळावे, त्यांना आरोग्य सुदृढ ठेवण्याची सवय लागावी, याच हेतूने योगाभ्यास घेतला जात आहे.
बंदीवानांसाठी गळाभेट उपक्रमाद्वारे कौटुंबिक ओलावा जपण्यासासाठी प्राधान्य दिले जाते. विशेषतः बंदीवान आणि मुलांमध्ये होणारे सुसंवाद त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्यास मदत होत आहे. गळाभेट उपक्रमातून स्पर्शाची भावना आणि कौटुंबिक विचारांची देवाण-घेवाण होत असल्यामुळे बंदीवान समाधानी आहेत. कोरोना संसर्गानंतर उपक्रमाची अमलबजावणीला टप्प्याटप्प्याने सुरूवात केली आहे.
अमिताभ गुप्ता, अपर महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह सुधारसेवा, महाराष्ट्र





























































