
सामना ऑनलाईन, मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर चालत्या लोकलमध्ये उतरून धोकादायकपणे नृत्य करण्याचा ‘किकी चॅलेंज’ हे धोकादायक नृत्य करून त्याचा व्हिडीओ यू टय़ूबवर टाकल्याच्या प्रकरणात धारावीत राहणाऱ्या तिघा इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांना मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने शिताफीने अटक केली आहे. मॅजिस्ट्रेटसमोर या त्रिकुटास हजर केले असता त्यांना ‘किकी चॅलेज’ या गैरप्रकाराविषयी तरुणांमध्ये जनजागृती करण्याची अनोखी शिक्षा न्यायाधीशांनी सुनावली आहे.
सीएसएमटीच्या फलाट क्र. 3 आणि 4 वर लोकलमधून उतरत किकी चॅलेंजचा नृत्यप्रकार करून त्याचा व्हिडीओ यू टय़ूबवर अपलोड करण्यात आला होता. या प्रकरणात 145(ब), 147 आणि 156 रेल्वे ऍक्टनुसार सीएसएमटीच्या आरपीएफ पोस्टमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सीएसएमटीच्या या व्हिडीओमध्ये ‘सोमू स्टुडिओ’ असे नाव क्रेडिट लाइनमध्ये टाकण्यात आले होते. या प्रकरणात गुगलशी संपर्क करूनही काही प्रतिसाद न आल्याने अखेर गुप्त माहिती आधारे धारावीत हे तरुण राहत असल्याचे उघड झाले. बीकेसीतील सायबर सेलच्या मदतीने ज्या संगणकातून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला त्याचा आयपी ऍड्रेस शोधण्यात आला. त्याआधारे बीएस्सी आयटी शिकलेला सुरेश रामकुमार गौतम (23), इलेक्ट्रॉनिक इंजिनीयर अब्दुल कादर मोहम्मद युसूफ (22) आणि कन्हैया कुमार (23) यांना धारावीतून अटक करण्यात आली. महानगर दंडाधिकारी विनय मुगलीकर यांच्या न्यायालयात त्यांना आज हजर केले असता त्यांना अशा प्रकारचे किकी चॅलेंज करणे कसे धोकादायक आहे याविषयी या तरुणांना जनप्रबोधन करण्याची शिक्षा देण्यात आली असून त्यासंबंधित एका आठवडय़ात प्रतिज्ञापत्र करून नेमके काय प्रबोधन केले हे सांगण्याचेही बंधन त्यांच्यावर टाकण्यात आले आहे.
वसई-विरारमध्येही असाच प्रकार
अशाच प्रकारचा एक व्हिडीओ वसई आणि विरार स्थानकातदेखील छायाचित्रीत करण्यात आला होता. या प्रकरणात वसई पोलिसांनी तातडीने या तरुणांना जेरबंद केले होते. त्यांनाही स्थानकाची साफसफाई करण्याची अनोखी शिक्षा न्यायाधीशांनी दिली होती.



























































