
धोनी ऍण्ड कंपनीचे कडेकोट क्षेत्ररक्षण आणि अचूक माऱयामुळे सिकंदर रझाला शेवटच्या षटकात चौकार मारणे कठीण झाले होते, पण त्यानंतरही त्याने 3 चेंडूंत 7 धावा धावून काढत चेन्नईच्या तोंडातून विजयाचा घास पळवण्याचा पराक्रम केला. चेन्नईचे 201 धावांचे जबरदस्त आव्हान पंजाबने सिकंदर रझामुळे शेवटच्या चेंडूवर तिहेरी धाव काढून पार पाडले. चेपॉकच्या खेळपट्टीवर दोनशेचा आकडा गाठत जिंकण्याचा मान मिळविणारा पंजाब पहिला संघ ठरला. या विजयामुळे पंजाबने पाचव्या विजयासह गुणतालिकेत पाचवे स्थान संपादले.
चेन्नईच्या 201 या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला आघाडीच्या जवळजवळ सर्वच फलंदाजांची छोटय़ा खेळांची साथ दिली. त्यामुळे पंजाब षटकामागे दहा धावांची गती राखत विजयाच्या ट्रकवर होता.
लिव्हिंगस्टोनचा झंझावात
पंजाबने 15 षटकांत 129 धावा केल्या होत्या. विजयासाठी 30 चेंडूंत 72 धावांची गरज होती. चेन्नईचे पारडे जड होते, पण 16 व्या षटकांत लिव्हिंगस्टोनने सामनाच फिरवला. त्याने तुषार देशपांडेच्या सलग चार चेंडूंवर तीन खणखणीत षटकार खेचले आणि षटकांत 24 धावा वसूल केल्या. 19 चेंडूंत 22 धावा करणाऱया लिव्हिंगस्टोनने 24 चेंडूंत 40 धावा काढल्या. तो देशपांडेच्याच गोलंदाजीवर बाद झाला. मग सॅमने रवींद्र जाडेजाला दोन षटकार खेचत पंजाबला विजयासमीप नेले. 3 षटकांत 31 धावा हव्या असताना सॅमचा त्रिफळा पथिराणाने उडवला. तरीही 18 व्या षटकांत 9 आणि 19 व्या षटकांत 13 धावा काढत पंजाबने 192 अशी मजल मारली. त्याआधी पंजाबला प्रभसिमरन सिंह (42) आणि शिखर धवन (28) यांनी 4 षटकांत 50 धावांची सलामी दिली होती.
रझाची पथिराणावर मात
शेवटच्या षटकात 9 धावांची गरज होती. पथिराणाच्या अचूक माऱयामुळे रझा आणि शाहरुखला त्याचा सामना करणे कठीण जात होते. चार चेंडूंत 7 धावांची गरज होती आणि पथिराणाने तिसरा चेंडू निर्धाव टाकला. त्यामुळे रझावर दबाव वाढला. तरीही त्याने पुढील दोन्ही चेंडूंवर 2-2 धावा काढल्या. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज होती. तेव्हा रझाने गॅपमध्ये चेंडू मारला आणि रझा-शाहरुख धावत सुटले. कुणाचा विश्वास बसणार नाही, पण दोघांनी 3 धावा काढल्या आणि पंजाबने थरारक विजय नोंदविला. रझा पंजाबचा सिकंदर ठरला. या लढतीत अनेक खेळाडू जबरदस्त खेळले, पण जीताता है वोही सिकंदर होता है, हे रझाने दाखवून दिले.
कॉन्वेचे वादळ
आज चेन्नईच्या फलंदाजीत डेव्हन कॉन्वेचे वादळ घोंघावले. त्याने ऋतुराज गायकवाडच्या साथीने 86 धावांची सलामी दिली. तो शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकला, मात्र त्याला आपले शतक पूर्ण करता आले नाही. त्याने 52 चेंडूंत 16 चौकार ठोकले, पण त्याला एकच षटकार ठोकता आला. त्याला शिवम दुबेची (28) सुरेख साथ लाभली. शेवटच्या षटकात फलंदाजीला आलेल्या धोनीने 4 चेंडूंत 2 षटकार खेचत 13 धावा काढल्या.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपरकिंग्ज ः 20 षटकांत 4 बाद 200 (ऋतुराज गायकवाड 37, डेव्हन कॉन्वे 92, शिवम दुबे 28, अर्शदीप सिंग 4-0-371, सिकंदर रझा 3-0-31-1).
पंजाब किंग्ज ः 20 षटकांत 6 बाद 201 (प्रभसिमरन सिंह 42, शिखर धवन 28, लिआम लिव्हिंगस्टोन 40, सॅम करण 29, जितेश शर्मा 21, रवींद्र जाडेजा 4-0-32-2, तुषार देशपांडे 4-0-49-3).
आयपीएल गुणतालिका
संघ सा. वि. प. ने. र. गुण
गुजरात 8 6 2 0.638 12 लखनौ 8 5 3 0.841 10
राजस्थान 9 5 4 0.800 10
चेन्नई 9 5 4 0.329 10
पंजाब 9 5 4 -0.447 10
बंगळुरू 8 4 4 -0.139 8
मुंबई 8 4 4 -0.502 8
कोलकाता 9 3 6 -0.147 6
हैदराबाद 8 3 5 -0.577 6
दिल्ली 8 2 6 -0.898 4
टीप ः सा-सामना, वि-विजय, प-पराजय,ऩे र.- नेट रनरेट
ही आकडेवारी मुंबई-राजस्थानपर्यंतची आहे.
अव्वल फलंदाज
फलंदाज सा. धावा सरासरी 4 6
जैस्वाल 9 428 47.55 56 18
डय़ुप्लेसिस 8 422 60.28 34 27
कॉन्वे 9 414 59.14 50 13
गायकवाड 9 354 44.25 23 19
कोहली 8 333 47.57 31 11
अव्वल गोलंदाज
गोलंदाज सा. वि. सरासरी 4 वि. 5 वि.
देशपाडे 9 17 21.70 0 0
अर्शदीप 9 15 19.66 1 0
सिराज 8 14 16.64 1 0
राशिद 8 14 20.00 0 0
चावला 8 13 17.38 0 0





















































