अश्विनने खिलाडूवृत्ती दाखवायला हवी होती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

आयपीएलच्या सोमवारी रात्री झालेल्या लढतीत सभ्य गृहस्थांच्या क्रिकेट खेळात अखिलाडूवृत्ती दिसून आली. किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने चेंडू टाकण्याआधी नॉन स्ट्राईककडील यष्टय़ांवरील बेल्स उडवल्या. त्यावेळी जोस बटलर धाव घेण्यासाठी क्रीझ बाहेर निघाला होता. त्यामुळे पंचांनी त्याला बाद ठरवले. या पद्धतीला ‘मंकडाईट’ असे संबोधतात. रविचंद्रन अश्विनच्या या कृत्यामुळे चोहोबाजूंनी त्याच्यावर टीका करण्यात आली. हे योग्यच आहे. कारण क्रिकेटमध्ये अखिलाडूवृत्तीला थारा नाही.

रविचंद्रन अश्विनने बेल्स उडवण्याच्या आधी पंचांना सांगून फलंदाजाला ‘वार्निंग’ द्यायला हवी होती, पण प्रत्यक्षात असे काही झाले नाही. काही वर्षांपूर्वी इंग्लंडमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. एखादा फलंदाज चेंडूला सामोरा गेल्यानंतर त्याच्याजवळ तो पडल्यास हाताने उचलून तो क्षेत्ररक्षकाला देतो. खरेतर हे नियमात बसत नाही. पण त्यावेळी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून खिलाडूवृत्ती दाखवली जाते तर मग रविचंद्रन अश्विनने खिलाडूवृत्ती का नाही दाखवली, असा प्रश्न येथे उपस्थित होतो.

बीसीसीआयने ‘त्याला’ झापले
गोलंदाजाने आपल्या कौशल्याने फलंदाजाला बाद करावे ही खिलाडूवृत्ती आहे. रविचंद्रन अश्विनने खिलाडूवृत्तीचे भान राखणे गरजेचे होते. सामनाधिकारी व पंच यांच्याकडूनही निर्णय देण्यात चूक झाली, अशा शब्दांत बीसीसीआयने रविचंद्रन अश्विनला सुनावले.

नियमाप्रमाणे बटलरला बाद केले – अश्विन
‘बटलरला मंकड पद्धतीने बाद करण्याची कोणतीही योजना नव्हती. असे क्षण सामन्याला कलाटणी देणारे ठरतात. त्यामुळे फलंदाजांनी सावध राहायला हवे. क्रिकेटच्या नियमाप्रमाणे बटलरला बाद केले आहे. यात मी काही चुकीचे केले नाही’, असे रविचंद्रन अश्विनने स्पष्टीकरण दिले.

बैठकीत निर्णय घेण्यात आला होता – राजीव शुक्ला
आयपीएलचे कर्णधार आणि सामानाधिकारी यांच्यासोबत एकदा एक बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत मी चेअरमन म्हणून हजर होतो. तेव्हा असे ठरवण्यात आले होते की, जर नॉन स्ट्राईकवरील फलंदाज चेंडू टाकण्याआधी क्रीजच्या बाहेर निघाला, तर खिलाडूवृत्ती दाखवत गोलंदाजाने बेल्स उडवू नयेत. त्या बैठकीत विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी हे दोघेही उपस्थित होते’, असे ट्विट आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी केले आहे.

हिंदुस्थानच्या न्यूझीलंड दौऱ्यातही कर्णधार विराट कोहलीकडून अशोभनीय गोष्ट घडली. सराव सामन्यादरम्यान विराट कोहली शॉर्ट (हाफ पॅण्ट) घालून खेळपट्टीवर आला. हे वर्तन पटण्यासारखे नव्हे. याशिवाय प्रतिस्पर्ध्यांवर धावत जाणे, शिवीगाळ करणे हेही त्याचे वागणे बरे नव्हे. आयसीसीसह बीसीसीआयने अशा गोष्टींवर आळा बसवायला हवा.
– माधव गोठोस्कर (लेखक आंतरराष्ट्रीय पंच आहेत)