
राहाता पालिकेची डास प्रतिंधक फॉगिंग करताना चार जणांना डिझेल व पेट्रोलची अफरातफर करताना प्रभारी आयएएस महिला मुख्याधिकारी यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. 100 दिवसांत 2 लाख 16 हजार रुपयाची अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येऊन चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना राहाता शहरात जंगल प्रभागात बुधवारी 10 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक दिपक जग्रवाल याने दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलीसांनी किरण बाळासाहेब थोरात, ललित सुनिल निकाळे, अविनाश कैलास निकाळे, सागर राजू कासार या चार जणांना या अफरातफर प्रकरणी तसेच पालिकेचे वाहन घंटा गाडी विना परवानगी स्वतःच्या फायद्यासाठी वापरले म्हणून अटक केली.
याबाबतची माहिती अशी की, राहाता पालिकेच्या डास प्रतिबंधक फॉगींगचे टेंडर एका खासगी कंपनीला 10 जानेवारी 2019 पासून दिले होते. त्यासाठी लागणारे डिझल व पेट्रोल पालिका पुरवीत होती. विश्वासाने दररोज दिल्या जाणाऱ्या पेट्रोल व डिझेलमधे अफरातफर करून टेंडर दिल्यापासून ते 11 डिसेंबर 2019 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत अशा 100 दिवसात डिझेलची दोन हजार लिटरची 1 लाख 36 हजार रूपये व पेट्रोलची एक हजार लिटरची 80 हजार रुपयांची अशी एकून 2 लाख 16 हजार रुपयांची अफरातफर केली. तसेच पालिकेच्या मालकीचे शासकीय वाहन घंटा गाडी विना परवानगीने स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर केला. या प्रकरणी चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
गेल्या तीन महिन्यापासून राहाता शहरात डेंगू मलेरिया, थंडी ताप या साथीच्या रोगाने संपूर्ण राहाता शहराला विळखा घातला असताना शहरात फॉगिंग करावे अशी मागणी केली जात होती. मात्र प्रत्यक्षात औषध फवारणी होत नव्हती. यामुळे शेकडो नागरिक आजारी पडले, हजारो रूपये दवाखान्यात उपचारावर खर्च करावे लागले. या प्रश्नी सर्वच नगरसेवकांनी तक्रारी करूनही पालिका प्रशासन लक्ष देत नव्हते. कधी तरी एखाद्या प्रभागात तात्पुरती फवारणी केली जात असे. मात्र त्यासाठी लागणारे डिझेल व पेट्रोल रोज पालिकेकडून घेतले जात होते. गेल्या आठ महिन्यांपासून पालिकेला मुख्याधिकारी नसल्याने येथे मनमानी कारभार सुरू होता. प्रभारी मुख्याधिकारी पालिकेकडे फिरकत नव्हते. या संधीचा पालिकेच्या काही अधिकारी व पदाधिकारी व ठेकेदार यांनी फायदा उचलून अनेक वेळी फवारणी न करता रोज डिझेल व पेट्रोल घेऊन अफरातफर केली.
नुकत्याच पालिकेत मुख्याधिकारी म्हणून आलेल्या आयएएस महिला अधिकारी यांना संशय आल्याने त्यांनी या फॉगिंग करणाऱ्या ठेकेदाराच्या माणसांवर लक्ष ठेवण्यासाठी एक गोपनीय पथक नेमले. सर्व माहिती व काय प्रकार होतोय हे लक्षात घेऊन सदर महिला अधिकारी यांनी बुधवारी पावणे दहा वाजेच्या सुमारास ज्या परिसरात औषध फवारणी सुरू होती, तेथे पथकासह जाऊन ही चोरी पकडली. सदर कारवाईचे सर्व नगरसेवक व नागरिकांची स्वागत केले असून कर्तव्यदक्ष महिला अधिकारी असीमा मित्तल यांचे अभिनंदन केले जात आहे.
बड्या माशांवर कारवाईची मागणी
गेल्या 100 दिवसांपासून हा प्रकार राजरोस घडत होता. पालिकेचे प्रमुख अधिकारीच संबधितांना डिझेलसाठी पेट्रोल पंपवाल्याना लेखी चिठ्ठी देत होते. तर यावर देखरेख करणारे अधिकारी कोठे होते. तसेच ज्या कंपनीने हा ठेका घेतला होता त्याचा कोणीच माणूस येथे नव्हता, मग हे काम कोण करत होते याचाही शोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ज्या चार तरूणांना या गुन्ह्यात अटक केली ते बेरोजगार तरूण असल्याचे कळते. त्यातील काही जण पहिल्यांदाच हे औषध फवारणी करता गेले होते. त्यामुळे यात अनेक बडे मासे गुंतले असून त्यांची चौकशी होणे गरजेचे असून जे अधिकारी याला जबाबदार आहे. त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी नगरसेवक व नागरिकांनी केली आहे.





























































