Rahul Deshpande भाजपने केला राहुल देशपांडेचा घोर अपमान, टायगर श्रॉफसाठी गाणे मध्येच थांबवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपने वरळीत दिवाळीचा उत्सव सुरू केला आहे. मात्र या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा घोर अपमान केल्याचा प्रकार घडला आहे. राहुल देशपांडे यांचे गायन सुरू असतानाच अभिनेता टायगर श्रॉफ याचे आगमन झाले तेव्हा देशपांडे यांचे गायन मध्येच थांबवून टायगरच्या सत्काराचा घाट घातला गेला. यामुळे देशपांडे चांगलेच संतापले आणि मी उठून जाऊ का? अशी विचारणा आयोजकांना केली. या प्रकारामुळे भाजपचे बेगडी मराठी प्रेम उघड झाले आहे.

राहुल देशपांडे यांच्या अपमानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. गाणे थांबवून टायगर श्रॉफ याला रंगमंचावर घेऊन येणाऱया भाजप आमदार मिहीर कोटेचा यांना देशपांडे यांनी चांगलेच फैलावर घेतल्याचे व्हिडीओत दिसते. मला गाऊ दे, माझे गाणे 20 मिनिटांत संपेल. त्यानंतर तुम्हाला काय हवे ते करा असे संतप्तपणे देशपांडे यांनी आयोजकांना तर सुनावलेच पण मी गाऊ की ऊठून जाऊ अशी विचारणाही केली. या व्हिडीओवर देशपांडे यांनी उशिरा एवढे काही मोठे प्रकरण नव्हते अशी प्रतिक्रिया दिली असली तरी अपमानाचा प्रकार घडलेला नाही असेही त्यांनी सांगितलेले नाही.

एका मराठी कलावंताच्या अपमानावरून राजकीय क्षेत्रातही तीक्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हिंदी चित्रपट अभिनेत्यासाठी मराठी कलावंताचा अपमान करणे दुर्दैवी असल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी दिली असून काँग्रेस-राष्ट्रवादीनेही भाजपच्या या मराठी प्रेमाबद्दल तीक्र नाराजी व्यक्त केली आहे.